भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची पाकिस्तानला आली पुन्हा खुमखुमी
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना गरज पडल्यास भारताविरुद्ध अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे.पाकिस्तानचे हे तुणतुणे जुनेच आहे व नेहमीचेच आहे.आज मात्र या धमकीचे वेगळ्या अर्थाने विचार करण्याची गरज येउन पडली आहे.भारतात सत्तांतर होऊन अनेक वर्ष झाले आहे.हिंदुत्ववादी मोदी सत्तेवर आहेत.त्यांच्या परराष्ट्र नीतीने अमेरिका सारखे महाबलाढ्य राष्ट्र भारताचे मित्र बनू पाहत आहेत.जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून गणले जाणारे बराक ओबामा यांना आपले पंतप्रधान अरे तुरेने संबोधून आपली मैत्री दर्शवित आहेत.तर बऱ्याच देशांमध्ये मोदींनी आपला मैत्रीचा अश्वमेध उधळला आहे.याला विरोध म्हणून रशिया पाकिस्तान कडे झुकला आहे.चीन तर उघड उघड भारतविरोधी चालला आहे.पाकिस्तानला भारतविरोधासाठी सर्व मदत करत आहे.पाकिस्तानच्या दोन संघटनांना अतिरेकी संघटना म्हणून जगाने मान्यता द्यावी व पाकिस्तानने त्यांच्याविरोधी कार्यवाही करावी या साठी भारत सरकार कंबर कसून कामाला लागले आहे.सर्व देशांना ह्या विषयी विनंती करीत आहे परंतु चीनने उघड विरोध दर्शविल्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणात सदैव भारताचा मित्र असलेल्या रशियाने मात्र या वेळी पाकिस्तानच्या बाजूने आपले पारडे झुकविले आहे आणी नेमकी अडचण येथेच आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप व संकेत बदलत चालले आहेत.मैत्रीच्या परिभाषा आपल्या परीने बदलत आहेत.नवीन मित्र व आघाड्यांचा उदय होण्याचा हा काळ आल्याचे दिसून येत आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी हि संक्रमण अवस्था आहे.
पाकिस्तानची वाटचाल दिवाळखोरीकडे चाललेली आहे.अंतर्गत वाद यादवीच्या स्वरुपात उफाळून येण्याची शक्यता आहे.नेहमी प्रमाणेच जनक्षोभ थांबवायचा असेल तर भारत विरोधी गरळ ओकली पाहिजे या हेतूने पाकिस्तान वागत आहे.यात आत्ताच भारताने म्यानमार मध्ये घुसून अतिरेक्यांविरुद्ध केलेल्या कारवाई मुळे पाकिस्तान मनातून प्रचंड हादरलेला आहे हेही यामागचे कारण आपण समजून घेतले पाहिजे.
आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बदलता प्रवाह आज समुद्र मंथना सारखा झाला आहे.याच्या मधून निघणारे हलाहल भारतालाच मोठे भाऊ म्हणून पचवावे लागणार आहे.मोदींच्या परदेश दौऱ्याला सवंग प्रसिद्धी देऊन माध्यमांनी संवेदनशील असलेल्या विषयाकडे दुर्लक्ष तर होत नाही ना व यामुळे दूरगामी मोठे परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला भोगावे लागणार नाही ना याचा विचार नरेंद्र मोदी,आंतरराष्ट्रीय राजकारणातील तज्ञ यांना करावा लागणार आहे.नाहीतर सवंग प्रसिद्धी साठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मुळ पाया उखडून जाण्याची शक्यता आहे.याची जाणीव ठेऊनच वाटचाल करावी लागणार आहे.सावध राहा रात्र वैऱ्याची आहे.

No comments:
Post a Comment