Thursday, 19 November 2015

आज 19 नोव्‍हेंबर जागतिक शौचालय दिनानिमित्‍त मिलिंद व्‍यवहारे यांचा विशेष लेख प्रकाशीत करीत आहोत




आरोग्‍य संपन्‍न जीवन जगण्‍यासाठी जशी उत्‍तम आहाराची गरज आहे. तसेच स्‍वच्‍छ वातावरणाची देखील आवश्‍यकता आहे. निसर्गाने आपल्‍याला स्‍वच्‍छ पाणी, स्‍वच्‍छ हवा व स्‍वच्‍छ अन्‍नधान्‍य दिले असले तरी मानवाच्‍या उघडया शौचविधीमुळे हवा, पाणी व अन्‍नधान्‍य दूषित होत आहेत. कारण पावसाच्‍या पडणा-या पाण्‍यात ही मैला मिसळल्‍यामुळे ते दुषित होते. तसेच उघडया हागणदारीमुळे देखील वातावरणात दूर्गंधी पसरुन अनेक आजाराला आपण निमंत्रण देत आहोत. या सर्व बाबतीचा आपल्‍याला सामना करण्‍यासाठी घर तेथे शौचालयाची आवश्‍यकता आहे.
      स्‍वच्‍छतेच्‍या व्‍याप्‍तीसाठी स्‍वच्‍छतागृहाची आवश्‍यकता आहे. लोकांमध्‍ये याची जनजागृती व्‍हावी, लोकांनी शौचालय बांधावीत यासाठी 19 नोव्‍हेंबर हा दिवस जागतिक स्‍वच्‍छतागृह दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. 17 ते 20 नोव्‍हेंबर 2004 या कालावधीमध्‍ये बिजींग येथे जागतिक स्‍वच्‍छतागृह परिषद भरवली गेली. या परिषदेत अनेक देशांच्‍या प्रतिनिधीसोबत जागतिक नामवंत स्‍वच्‍छतातज्ञांनी भाग घेतला होता. यात स्‍वच्‍छतागृहाला एक अनिवार्य मूलभूत गरज म्‍हणून दर्जा देतांनाच भौगोलिक रचनेनुसार स्‍वच्‍छतागृहाचे नमुने उभारण्‍यात आले. यात भारतासाठी शोषखड्डयाच्‍या स्‍वच्‍छतागृहाची शिफारस करण्‍यात आली. या वर्षापासूनच 19 नोव्‍हेंबर हा दिवस दरवर्षी स्‍वच्‍छतागृह दिन म्‍हणून साजरा करण्‍याचा निर्णय संयुक्‍त राष्‍ट्रसंघाने घेतला. यामागचा हाच हेतू आहे की, ग्रामीण भागातील नागरीक मोठया प्रमाणात उघडयावर शौचविधीस जातात त्‍याला आवर घातल्‍यास ग्रामीण भागात आरोग्‍यमान उंचावेल. लोकांची मानसिकता बदलण्‍यासाठी अनेक प्रयत्‍न जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने करण्‍यात आले. त्‍यामुळे मोठया प्रमाणात यश मिळाले आहे.
      घराजवळ स्‍वच्‍छतागृह असेल तर त्‍याचा वास येईल, दूर्गंधी येईल, पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या बोरमध्‍ये पाणी जाईय या शंकेमुळे अनेक लोक शौचालय बांधत नाहीत, दुसरे म्‍हणजे शौचलयासाठी पैसा नाही, जागा नाही तसेच शौचालय बांधण्‍यासाठी अनुदान मिळत नाही ही कारण पुढे येत असल्‍यामुळे लोक शौचालय बांधत नसल्‍याचे ग्रामीण भागातील लोकांशी चर्चा केल्‍यानंतर हया बाबीचा खुलासा होतो. परंतु अशी स्थिती नाही. आज प्रत्‍येक कुटुंबातील व्‍यक्‍तीकडे मोबाईल आहे. घरात टेलिव्‍हीजन आहे. भौतिक जीवनाच्‍या सर्व सुखसोई आहेत परंतु शौचालय बांधण्‍याची मानसिकताच नाही, हेच कारण खरे असले तरी गृहभेटीतून महत्‍व पटवून दिल्‍यास बदल होऊ शकतो.
      स्‍वच्‍छतेच्‍या व्‍याप्‍तीसाठी देशातील नागरीकांना हात धुणे किती महत्‍वाचे आहे, हे सांगण्‍यासाठी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येतो. यानिमित्‍त हात धुण्‍याची पाच टप्‍पे नांदेड जिल्‍हयातील नागरीकांना सांगण्‍यात आले. हात कसे धुवावेत यासाठी पाच दिवसाची राज्‍यस्‍तरीय कार्यशाळाही मुंबई येथे घेण्‍यात आली होती आणि आता स्‍वच्‍छतागृह प्रत्‍येकाच्‍या घरी असणे व त्‍याचा वापर करणे यासाठी 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्‍वच्‍छतागृह दिवस म्‍हणून जगात साजरा करण्‍यात येत आहे. या सर्व बाबीसाठी शासनाच्‍या वतीने विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. परंतु याला लोकसहभागाची आवश्‍यकता आहे. कारण हे अभियानच लोकसहभागावर आधारीत आहे. ज्‍या गावात लोकांनी लोकसहभाग दिला त्‍या गावात पाणी व स्‍वच्‍छता मिशनच्‍या वतीने गावात जावून मार्गदर्शन करण्‍यात येते.
      या अभियानाचा मुख्‍य भाग म्‍हणजे स्‍वच्‍छतागृह. हे स्‍वच्‍छतागृह बांधतांना लोकांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, सेप्‍टीक टँकचे शौचालय न बांधता सोप्‍या शौचालयाचे अर्थात शोषखड्डयाचे शौचालय बांधावे. यासाठी खर्च देखील कमी लागणार आहे. दोन खड्डयाचे शौचालय असेल तर ते पिढयांपिढया चालणारे शौचालय असेल. दुसरी बाब म्‍हणजे तांत्रिकदृष्‍टया बांधण्‍यात आलेल्‍या शौचालयाचा वास किंवा दुर्गंधी येत नाही. शौचालयाच्‍या व्‍याप्‍तीसाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंब तसेच दारिद्रय रेषेवरील अल्‍पभूधारक, भूमिहीन शेतकरी, महिला प्रधान व अपंग कुटुंब यांनाही 12 हजार रुपये अनुदान देण्‍यात येत आहे. नांदेड जिल्‍हयात शौचालयासह स्‍नानगृह बांधण्‍यात आली आहेत. यासाठी जिल्‍हा परिषद आणि पंचायत समितीचे पदाधिकारी यांच्‍या मार्गदर्शनात शौचालय बांधकाम करण्‍यात येत आहेत. तसेच गावस्‍तरावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांनी मुक्‍कम करुन लोकांची मानसिकता बदलवली, एवढेच नव्‍हे तर प्रत्‍यक्ष शौचालय उभारण्‍यासाठी पुढाकार ही घेतला त्‍यामुळेच शौचालय बांधकामात नांदेड जिल्‍हा राज्‍यात अव्‍वल ठरला आहे. चालू वर्षात जिल्‍हयातील 465 ग्राम पंचायती निर्मल करण्‍यासाठी निवडण्‍यात आले असून आजपासून या गावात शौचालय बांधकामास गती देण्‍यात येणार आहे. मार्च अखेर या गावातून सुमारे 85 हजार शौचालयाचे बांधकाम करण्‍यात येणार आहे.       
      जागतिक स्‍वच्‍छतागृह दिनानिमित्‍त आज जिल्‍हयातील सर्व गावातून स्‍वच्‍छता व स्‍वच्‍छतागृहाचे महत्‍व सांगण्‍यात येणार आहे. तसेच प्रत्‍यक्ष बांधकामाचा शुभारंभही करण्‍यात येणार आहे. तरी नागरीकांच्‍या आजच्‍या दिवशी आपल्‍या गावात जागतिक दिनानिमित्‍त होणा-या कार्यक्रमात सहभागी होवून शौचालय बांधकामाचा शुभारंभ करुन स्‍वच्‍छतेचे पाऊल उचलल्‍यास जिल्‍हयातील सर्व कुटुंबाकडे स्‍वच्‍छतागृह असतील पर्यायाने आपला जिल्‍हा निर्मल झालेला असेत, यात शंका नाही.
 मिलिंद व्‍यवहारे
जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक,
जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन 
जिल्‍हा परिषद, नांदेड
8626025825

No comments: