Thursday, 19 November 2015

फुलवळ सर्कल शौचालयाच्‍या बांधकामात लय भारी - जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर




नांदेड, 19- शौचालय बांधकामात नांदेड जिल्‍हयात फुलवळ सर्कल लय भारी ठरेल असे मत जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी व्‍यक्‍त केले.
     जागतिक शौचालय दिनानिमित्‍त कंधार तालुक्‍यातील मुंडेवाडी येथे शौचालय बांधकामाचा शुभारंभ वर्षाताई भोसीकर यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आला, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. सरपंच कांताबाई ज्ञानोबा मुंडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात संजय भोसीकर, मिनी बिडीओ प्रदीप सोनटक्‍के, अरुन घोडसे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, स्‍वच्‍छतातज्ञ विशाल कदम, हनमंत पेटकर, शिवहार मंगनाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, गाव समृध्‍दीसाठी स्‍वच्‍छता आवश्‍यक असून घर तेथे शौचालय बांधून आपले गाव निर्मल करावे. उघडया हागणदारीमुळे महिलांची मोठी कुचंबना होते, शिवाय अनेक आजारांचा सामना देखील करावा लागतो. शौचालय बांधकामासाठी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून या मोहिमेत नांदेड जिल्‍हा राज्‍यात अव्‍वलस्‍थानी आहे. गावस्‍तरावर शौचालय बांधकामाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी ज्‍यांच्‍याकडे वापरातले शौचालय आहे अशा कुटुंबांच्‍या घरावर लय भारी हे हिरव्‍या कलरचे स्टिकर लावण्‍यात येणार आहे.
     ज्‍यांच्‍याकडे शौचालय आहे परंतु त्‍याचा वापर होत नाही त्‍यांच्‍या घरावर पिवळया कलरचे फिफ्टी फिफ्टी नावाचे स्टिकर लावण्‍यात येईल, स्‍वच्‍छतागृह नादुरुस्‍त असेल तर त्‍यांच्‍या घरावर केशरी कलरमये असलेल्‍या जरा जपून नावाचे स्टिकर लागेल तर ज्‍या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबाच्‍या घरावर लाल कलरचे खतरा-धोका नावाचे स्टिकर लावण्‍यात येईल. राज्‍य शासनाच्‍या पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता विभागाच्‍या वतीने हा उपक्रम राज्‍यभर राबविण्‍यात येणार असून फुलवळ सर्कलमध्‍ये घरतेथे शौचालय बांधून या उपक्रमात फुलवळ सर्कल लय भारी ठरेल, असे मत जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी व्‍यक्‍त केले.
     प्रारंभी ग्राम पंचायतीच्‍या वतीने उपस्थित मान्यवरांचा शॉल, पुष्‍पहार व श्रीफळ देवून सत्‍कार करण्‍यात आला. त्‍यानंतर ग्राम विकास अधिकारी औराळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. यावेळी संजय भोसीकर, प्रदिप सोनटक्‍के, मिलिंद व्‍यवहारे, विशाल कदम यांनीही स्‍वच्‍छतेविषयी ग्रामस्‍थांना माहिती दिली. यावेळी उपसरपंच मालजी पाटील, हौसाजी मुंडे, दिगांबर मुंडे, बापूसाहेब मुंडे, शेषेराव मुंडे, रघुनाथ मुंडे,विनोद महाबळे, राजु मुंडे, सारजाबाई मुंडे,ज्ञानोबा मुंडे, पत्रकार धोंडीबा बोरगावे, मधुकर डांगे, धोंडोपंत मुंडे, मनिष मुंडे, ग्रामसेविका माया वाठोरे, गावातील प्रतिष्ठित महिला व पुरुष यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

No comments: