Wednesday, 18 November 2015

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त जिल्‍हयात शौचालय बांधकामाचा शुभारंभ कृती आराखडयातील 465 गावात विशेष उपक्रम



नांदेड, 18- आज 19 नोव्‍हेंबर जागतिक शौचालय दिवस यानिमित्‍ताने जिल्‍हयात स्‍वच्‍छतेसाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत. जिल्‍हयातील विविध गावांमध्‍ये शौचालय बांधकामाचा शुभारंभ करण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षातून देण्‍यात आली आहे.
     जागतिक शौचालय दिनानिमित्‍त नांदेड जिल्‍हयात शौचालय बांधकामाला गती देण्‍यात येणार आहे. याचा कृती कार्यक्रमही पंचायत समितीस्‍तरावर तयार करण्‍यात आला आहे. गावस्‍तरावर गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ, ग्राम विकास अधिकारी, जिल्‍हास्‍तरावरील तज्ञ, सल्‍लागार, ग्रामसेवक, तालुका गट समन्‍वयक, समुह समन्‍वयक हे ग्रामस्‍थांना शौचालयाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
      घर तेथे शौचालय, गाव स्‍वच्‍छता, शाळा व अंगणवाडी, ग्राम पंचायत इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्‍ये स्‍वच्‍छतागृह, वैयक्तिक स्‍वच्‍छता आदी विषयी जनजागृती करुन स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार आहे.

465 गावात विशेष उपक्रम
    दरवर्षी गावे निर्मल करण्‍यासाठी कृती आराखडा तयार करण्‍यात येतो. 2015-16 या वर्षात जिल्‍हयातील 465 ग्राम पंचायतींचा कृती आराखडा तयार करण्‍यात आला आहे. तालुका निहाय ग्राम पंचायती याप्रमाणे. अर्धापूर तालुक्‍यातील 31 ग्राम पंचायती, भोकर- 27, बिलोली- 24, देगलूर- 31, धर्माबाद- 21, हदगाव- 40, हिमायतनगर- 16, किनवट- 45, कंधार- 40, लोहा- 39, माहूर- 17, मुदखेड- 25, मुखेड- 41, नायगाव- 27, नांदेड- 20 तर उमरी तालुक्‍यातील 21 ग्राम पंचायतींचा समावेश आहे. 465 ग्राम पंचायतीमध्‍ये सुमारे 85 हजार शौचालय बांधकामाचे उदिष्‍ट देण्‍यात आले असून त्‍यापैकी आजमितीला 30 हजार शौचालय बांधुन पूर्ण झाली आहेत.
      या गावांमध्‍ये विशेष उपक्रम राबवून ही गावे निर्मल करण्‍यात येणार आहेत. या गावामध्‍ये जिल्‍हा व तालुकास्‍तरावरील अधिकारी व कर्मचारी गावात मुक्‍काम करुन गावक-यांना शौचालयाविषयी मार्गदर्शन तसेच शौचालयासह बांथरुम बांधण्‍यासाठी नागरीकांना प्रोत्‍साहित करण्‍यात येत आहे. येत्‍या मार्च 2016 अखेर 465 ग्राम पंचायती हागणदारीमुक्‍त करण्‍यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन मोहिम यशस्‍वी करावे, असे आवाहन जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी केले आहे.

No comments: