Sunday, 29 November 2015

महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी पुण्‍यात मुलींची शाळा सुरु करुन स्‍त्री शिक्षणाची मुहूर्तमेड रोवली - जि. प. स. वर्षाताई भोसीकर



नांदेड, 29- महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी पुण्‍यात मुलींची शाळा सुरु करुन स्‍त्री शिक्षणाची मुहूर्तमेड रोवली, यामुळेच महिला प्रत्‍येक क्षेत्रात प्रगती करु लागल्‍या आहेत, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
      महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या स्‍मृतीदिनानिमित्‍त कंधार येथील प्रियदर्शीनी माध्‍यमिक कन्‍या शाळेत घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी किशोर अंबेकर, सुधीर तपासे, कृष्‍णा भोसीकर, चॉदसाब, गंगाबाई लाडेकर, संभाजी नांदेडे, निळोबा चिरले आदींची उपस्थिती होती.
      पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांनी प्रथम क्रांतीज्‍योती सावि‍त्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. त्‍यानंतर आठराव्‍या शतकात मुलींची पहिली शाळा पुण्‍यात सुरु केली. यामुळे महिलांना पुरुषांबरोबर समनाता मिळाली. आज प्रत्‍येक क्षेत्रात महिला पुढाकारने काम करुन आपली स्‍वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुले व ज्‍योतीबा फुले यांनाच जाते. यांचा वारसा पुढे चालविण्‍यासाठी प्रत्‍येक पालकांनी मुलींना शिक्षण देऊन त्‍यांना त्‍यांच्‍या पायावर उभे करावे असे आवाहन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
      प्रारंभी महात्‍मा ज्‍योतीबा फुले यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्‍यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर अंबेकर यांनी तर उपस्थितांचे आभार सुधीर तपासे यांनी मानले.

No comments: