नांदेड, 30- देशात स्वच्छ भारत अभियान मोठया उत्साहात राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अभियानामध्ये शौचालय बांधकाम करुन गाव हागणदारीमुक्त करणा-या ग्राम पंचायतींची तपासणी डिसेंबर महिण्यात करण्यात येणार असून ग्राम पंचायतीच्या पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे येत्या 5 डिसेंबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात 90 टक्के पर्यंत शौचालय बांधकाम असलेल्या ग्राम पंचायती यात सहभागी होऊ शकतात. वार्षिक कृती आराखडयात असणा-या ग्राम पंचायतींसह यापूर्वी निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेल्या ग्राम पंचायती व इतर गावांनाही या मोहिमेत सहभागी होता येणार आहे. यात शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत इमारतींना शौचालय असणे बंधनकारक असणार आहे. घर तेथे शौचालय या संकल्पनेसह गाव परिसरातील स्वच्छतेची पाहणीही करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरुन या गावांची तपासणी डिसेंबर महिण्याच्या दुस-या आठवडयात करण्यात येणार आहे. या मोहिमेत जी गावे पात्र ठरणार आहेत, अशा ग्राम पंचायतींना राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून हागणदारीमुक्त दर्जा प्राप्त ग्राम पंचायतींच्या नावांची घोषणा करुन या ग्राम पंचायतींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यासाठी ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व कुटूंब, संस्था यांच्याकडून सुरक्षित व शाश्वत स्वरुपात मानवी विष्ठा व्यवस्थापन पध्दतीचा वापर आणि वैयक्तिक स्तरावर स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार तसेच स्वच्छता विषयक स्थितीतील सातत्य राखण्यासाठी ग्राम पंचायतींची महत्वाची भूमिका राहणार आहे. हागणदारीमुक्त ग्राम पंचायत पडताळणी प्रक्रियेत ग्राम पंचायतीच्या सहभागासाठी ग्रामसभेची मंजुरी तसेच ग्राम पंचायतींच्या ठरावासह हे प्रस्ताव गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात येत्या 5 डिसेंबर पर्यंत सादर करावयाचे आहेत. तरी गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ व ग्रामसेवक यांनी आपल्या अधिनिस्त ग्राम पंचायतींचे प्रस्ताव विनाविलंब सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment