शौचालय असलेल्या घरांवर लागणार ‘ग्रीन स्टिकर’
जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांची माहिती
नांदेड-22, उत्तम आरोग्यासाठी घर तेथे शौचालय ही संकल्पना राबविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने देशभरात मोठे प्रयत्न केले जात आहेत. नांदेड जिल्हयाने स्वच्छ भारत अभियानात राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. त्यामुळे ज्या कुटूंबांनी शौचालय बांधून त्याचा वापर कायम सुरु ठेवला आहे, अशा घरांवर आता ग्रीन स्टिकर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई आनंदराव गुंडले यांनी दिली.
नांदेड जिल्हयात शौचालय बांधकामाच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शौचालयासह स्नानगृही अनेक कुटूंबांनी बांधले आहेत. चालू वर्षात नांदेड जिल्हयातील 465 ग्राम पंचायती हागणदारीमुक्त करण्यात येणार असून, सुमारे 85 हजार शौचालय बांधकामाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. 465 गावात गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी शौचालय बांधकामाचे नियोजन तयार केले आहे.
या माहिमेत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा व तालुक्याचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतल्यामुळेच शौचालय बांधकामात नांदेड जिल्हयाने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आता ज्या कुटूंबांनी शौचालय बांधून त्याचा वापर सुरु ठेवला आहे, अशा घरांवर ग्रीन कलरच्या स्टिकरर्ससह इतर चार प्रकारचे स्टिकर लावली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने ही मोहिम राज्यात राबविली जात आहे.
शौचालयाबरोबरच गटारमुक्त अभियानातून गावांना डासमुक्त करण्याच्या अभियानाने जिल्हयात मोठा वेग घेतला आहे, पहिल्या टप्प्यात सुमारे चारशे गावे डासमुक्त करण्यात येणार आहेत. ज्या गावात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहेत अशा गावांनी आता गटारमुक्त अभियानात सहभागी होऊन आपले गाव डासमुक्त करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment