Sunday, 29 November 2015

किर्तनातून स्‍वच्‍छतेचे धडे रुजविणारे अरविंद महाराज सोनखेडकर




नांदेड, 29, स्‍वच्‍छता ही सर्वाना प्रिय असते यासाठी प्रत्‍येक जण स्‍वच्‍छ राहण्‍याचे धडपड करत असतो. वैयक्तिक स्‍वच्‍छतेबरोबरच गावागावात स्‍वच्‍छता झाली तरच ग्रामीण भागातील नागरीकांचे आरोग्‍य अबाधित राहील. याच्‍या प्रबोधनासाठी हरिभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे सोनखेडकर हे त्‍यांच्‍या किर्तनातून स्‍वच्‍छतेचे धडे लोकांच्‍या मनावर बिंबवतात.
     स्‍वच्‍छतेसाठी देशभरात मोठी मोहिम चालू असून उघडयावरील हागणदारी बंद करण्‍यासाठी शौचालय बांधून त्‍याचा वापर करणे आवश्‍यक आहे. यासाठी लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी जिल्‍हा व तालुकास्‍तरावरील अधिकारी व कर्मचारी गावस्‍तरावर लोकांना स्‍वच्‍छतेची माहिती सांगतात. परंतु पहिल्‍याच वेळेत त्‍यांना या मोहिमेत यश मिळत नाही. 
     धार्मिक क्षेत्रातील गुरुंनी जर त्‍यांच्‍या प्रवचनातून आणि किर्तनातून स्‍वच्‍छतेची माहिती दिल्‍यानंतर यात मोठा बदल झाल्‍याचे दिसून येते. यासाठी राज्‍यस्‍तरावरुन पंढरपूर येथे किर्तनकारांची कार्यशाळा देखील घेण्‍यात आली होती. लोहा तालुक्‍यातील सोनखेड इथले हरीभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे हे गेल्‍या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात स्‍वच्‍छतेची व्‍याप्‍ती वाढविण्‍यासाठी त्यांच्‍या किर्तनातून प्रबोधन करत असतात. या त्‍यांच्‍या प्रबोधनामुळे अनेक गावात शौचालयाची निर्मिती झाली आहे.
      अरविंद महाराज यांना त्‍यांच्‍या वडिलांचा किर्तनाचा वारसा मिळाला. वयाच्‍या दहाव्‍या वर्षापासून ते या क्षेत्रात आहेत. वयाच्‍या पंधराव्‍या वर्षापासून त्‍यांनी किर्तनाला सुरुवात केली. आतापर्यंत त्‍यांनी 15 ते 20 हजार किर्तने केली आहेत. सन 2002 पासून किर्तनातून स्‍वच्‍छतेचा विषय हाताळायला सुरुवात केली. या किर्तनामुळे भक्‍तगणांनी शौचालये बांधल्‍यामुळे गावात अमुलाग्र बदल दिसून आला आहे. आपण सांगितल्‍यानंतर लोकांमध्‍ये परिवर्तन होते हे लक्षात आल्‍यामुळे प्रत्‍येक किर्तनामधून हा विषय घेत असल्‍याचे हरीभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे यांनी सांगितले.
     संत तुकाराम महाराजांनी सोनखेडला मुक्‍काम केला होता. त्‍यांच्‍या पादुका सोनखेड येथे असून देहू नंतर सोनखेड येथे बिज उत्‍सव मोठया प्रमाणात साजरा कला जातो. संत तुकाराम महाराजांचे मंदीरही सोनखेड येथे आहे. सोनखेड ग्राम पंचायत हागणदारीमुक्‍त करण्‍यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न असून त्‍यांच्‍या प्रबोधनाने सुमारे पाचशे शौचालये या ग्रामपंचायतीमध्‍ये निर्माण झाली आहेत. किर्तन आणि प्रवचन करणा-या महाराजांनी त्‍यांच्‍या किर्तनातून स्‍वच्‍छतेविषयी प्रबोधन केल्‍यास जिल्‍हा निर्मल होण्‍यास वेळ लागणार नाही असे मत हरीभक्‍त पारायण अरविंद महाराज मोरे व्‍यक्‍त केले.   

No comments: