नांदेड 22- ‘डासमुक्त’, ‘गटारमुक्त’ या अभियानाची सुरुवात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतुन आकाराला आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसोबत अभिसरण करून हे अभियान जिल्हयात सक्रीयपणे राबविण्यात येत आहे, या अभियानाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असुन राज्यभर हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात यावा याकरिता दिनांक 21 डिसेंबर 2015 रोजीच्या शासन निर्णयात डासमुक्तीचा ‘नांदेड पॅटर्न’ चा समावेश करण्यात आला आहे.
गावाच्या स्वच्छतेसाठी प्राधान्यपणे योजना राबविण्याच्या चौदाव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत पहिल्या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रॅन्टच्या वितरीत निधीतून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी (ग्रामपंचायतींनी) करावयाच्या विनियोग, त्याचे नियोजन व संनियंत्रणाच्या शासन निर्णय क्रमांक : चौविआ 2015/ प्र.क्र.26/ वित्त-4 दिनांक 21 दिसेंबर 2015 मध्ये डासमुक्तीचा ‘नांदेड पॅटर्न’ चा समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागील वर्षभरापासुन पिण्याच्या पाणी संदर्भात पाणी पुरवठ्याच्या स्त्रोतांचा विकास करणे,वीज देयक बचतीच्या उद्देशाने सोलार पंप बसविणे, पिण्याच्या पाण्याकरीता आरओ पाणी प्रणाली बसविणे,अंगणवाडीतील बालकांचा शैक्षणिक विकास करणे, शौचालय बांधकाम करणे आणि त्याचा वापर करणे आदी लोकाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी जनजागृती सुरु केली, कामाची आखणी करुन योजना सकारात्मकपणे राबविण्याचा निश्चय केला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचाही निर्णय घेतला. त्याचबरोबर दैनंदिन वापरातील पाणी नाल्यात जाऊन गटारात डासांची उत्पत्ती होते आणि डासांचा वावर वाढतो, डास चावल्यामुळे अनेक आजार होतात, त्यातुन मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. डासांमुळे डेंगू, मलेरिया आदी जिवघेणे रोगांचा प्रसार होतो. डासांपासुन बचाव करण्याकरीता ‘डासमुक्त गाव’ करण्यासाठी शोषखड्डयांची संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतुन आकाराला आली.
चौदाव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत ग्राम पंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबतचा शासन निर्णय यापूर्वीच निर्गमित करण्यात आला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यामध्ये मागील एक वर्षापासून नांदेड जिल्हयात गावविकासाच्या प्रक्रियेत शोषखड्डे तयार करुन त्यामध्ये घरातील सांडपाणी सोडण्याचा उपक्रम जिल्हयाभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन झाले, शोषखड्डयात पाणी मुरल्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढली, गाव स्वच्छ झाले, नाल्या कोरडया झाल्या आणि गटारमुक्त गाव झाल्यामुळे डासांची उत्पत्ती थांबली, डास नाहीसे झाले. त्यामुळे दैनंदिन नागरी जिवनावर चांगला परिणाम झाला. डासांपासूनचे आजार कमी झाले/नष्ट झाले. डास घालविण्यावर होणारा खर्च उदा-मच्छर छाप अगरबत्ती, लिक्वीड, कॉईल आदीचा वापर थांबला. मच्छर घालविण्यासाठी इलेक्ट्रीक पंखा वापरला जात असे तोही आता थांबला. परिणामी विद्युत देयक कमी झाले.
नांदेड जिल्हयातील टेंभर्णी येथील सरपंच प्रल्हाद पाटील टेंभूर्णीकर यांनी आपल्या गावात शोषखड्डयाचा उपक्रम राबविला. या गावातील उपक्रमाला जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश आदी राज्यांच्या अभ्यासगटाने भेटी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतला. जिल्हयाभरात हे अभियान राबविण्याची लोकचळवळ सुरु झाली. या चळवळीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई आनंद गुंडले, उपाध्यक्ष तथा कृषि व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे, शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे, बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहिफळे, समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, महिला व बाल कल्याण सभापती वंदनाताई लहानकर तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्हयातील सर्व पंचायत समिती सभापती व सदस्य आणि सर्व विभाग प्रमुख, जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. प्रत्येक तालुक्यात गाव दत्तक घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे अभियान सुरु आहे, हे या योजनेचे यशच म्हणावे लागेल.
जिल्हयातील पहिले डासमुक्त व गटारमुक्त गाव कामळज या ठिकाणी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांनी नुकतीच भेट दिली. जिल्हयात राबविण्यात येणा-या या अभियानास पालकमंत्री दिवाकररावजी रावते, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, महाराष्ट्रातील अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच राज्यातील अनेक राजकीय पदाधिकारी आदींनी भेटी दिल्या आहेत व या सर्वांनी डासमुक्त गावाची संकल्पना प्रत्याक्षात अनुभवली आहे. यातूनच 14 व्या वित्त आयोगाच्या कार्यक्रमामध्ये नांदेड जिल्हयातील ‘डासमुक्त’, ‘गटारमुक्त’ या अभियानाची दखल घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सोबत अभिसरण करून हे अभियान राज्यभर हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात यावा या करिता दिनांक 21 डिसेंबर 2015 रोजीच्या शासन निर्णयात डासमुक्तीचा ‘नांदेड पॅटर्न’ चा समावेश करण्यात आला आहे.





No comments:
Post a Comment