Tuesday, 29 December 2015

संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियानामध्‍ये टेंभूर्णी, नागराळ तर शाहु फुले आंबेडकर दलित वस्‍ती विकास अभियानात हिप्‍परगा, शेळगाव गौरी प्रथम



               नांदेड, 29, ग्रामीण भागातील नागरीकांचे आरोग्‍यमान उंचाविण्‍यासाठी संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात येते. सन 2014-15 वर्षांतर्गत जिल्‍हास्‍तरीय तपासणीमध्‍ये हिमायतनगर तालुक्‍यातील टेंभूर्णी व देगलुर तालुक्‍यातील नागराळ ग्राम पंचायतींना विभागून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्‍यात आले आहे. व्दितीय क्रमांक उमरी तालुक्‍यातील नागठाना व देगलूर तालुक्‍यातील इब्राहिमपूर ग्राम पंचायत तर कंधार तालुक्‍यातील तेलंगवाडी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे.
      शाहु फुले आंबेडकर दलित वस्‍ती विकास व सुधारणा अभियानात बिलोली तालुक्‍यातील हिप्‍परगा माळ व नायगाव तालुक्‍यातील शेळगाव गौरी ग्राम पंचायत प्रथम,  देगलुर तालुक्‍यातील नागराळ ग्राम पंचायत व्दितीय तर भोकर तालुक्‍यातील नारवट ग्राम पंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. दोन्‍ही अभियानात प्रथम पाच लाख रुपये, व्दितीय तीन लाख तर तृतीय क्रमांकास दोन लाख रुपये, प्रमाणपत्र असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे.  
      साने गुरुजी स्‍वच्‍छ शाळा स्‍पर्धेत नांदेड तालुक्‍यातील बोंढार नेरली येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा तर सावित्रीबाई फुले स्‍व्‍च्‍छ अंगणवाडी स्‍पर्धेत अर्धापूर तालुक्‍यातील बामणी येथील अंगणवाडी या पुरस्‍कारासाठी पात्र झाली आहे. या स्‍पर्धेत  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्‍कार- शेळगाव गौरी ता नायगाव, पाणी व्‍यवस्‍थापनासाठी स्‍व. वसंतराव नाईक पुरस्‍कार- बोंढार नेरली ता.नांदेड, कुटूंब कल्‍याणासाठी देण्‍यात येणारा स्‍व. आबासाहेब खेडकर पुरस्‍कार- कंधार तालुक्‍यातील तेलंगवाडी ग्राम पंचायतीने मिळविला आहे.
      ठाणे जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने सदर ग्राम पंचायतींची जिल्‍हास्‍तरीय तपासणी करण्‍यात आली होती. मंगळवार दिनांक 29 डिसेंबर रोजी या स्‍पर्धेचा निकाल घोषित करण्‍यात आला आहे. स्‍पर्धेत यशस्‍वी ठरलेल्‍या ग्राम पंचायतींचे जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे, उपाध्‍यक्ष दिलीप धोंडगे, शिक्षण व आरोग्‍य सभापती संजय बेळगे, अर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहिफळे, समाजकल्‍याण सभापती स्‍वप्निल चव्‍हाण, महिला व बालकल्‍याण सभापती वंदनाताई लहानकर, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड, यु.ए. कोमवाड यांनी अभिनंदन केले आहे.

No comments: