Saturday, 26 December 2015

डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न हरियाणा राज्‍यात राबविणार - पंचायत राजचे मुख्‍य अभियंता शंकर जिंदल



                                  नांदेड,26- शोषखड्डयाव्‍दारे जमिनीत पाणी मुरवून सांडपाणी व्‍यवस्‍थापनासह डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न महाराष्‍ट्र राज्‍यात लागू झाला असून, हा पॅटर्न हरियाना राज्‍यात राबविण्‍यात येणार असल्‍याचे मत हरियाना राज्‍यातील पंचायत राजचे मुख्‍य अभियंता श्री शंकर जिंदल यांनी व्‍यक्‍त केला.       दिनांक 26 डिसेंबर रोजी मुख्‍य अभियंता शंकर जिंदल यांच्‍यासह कार्यकारी अभियंता के.एस.जाखड, वाय.एस.पवार, आर.एस.दहिया, उपमंडळ अधिकारी प्रदीप कुमार हे हरीयाना राज्‍यातून डासमुक्‍ती अभियानाच्‍या अ‍भ्‍यासासाठी नांदेड दौ-यावर आले होते. लोहा तालुक्‍यातील कामळज ग्राम पंचायतीला भेट देऊन त्‍यांनी या अभियानाचा अभ्‍यास केला.       पुढे ते म्‍हणाले, ग्रामीण भागात सांडपाण्‍याचा मोठा प्रश्‍न भेडसावतो. यावर नांदेड जिल्‍हयात खूप कमी खर्चात शोषखड्डयांव्‍दारे सांडपाण्‍याचे व्‍यवस्‍थापन करुन मोठी क्रांती केली आहे. याव्‍दारे भूगर्भातील पाणी पातळी वाढीसह डासमुक्‍त गाव होण्‍यास मदत होत आहे. या शोषखडयांचे साधे सोपे तंत्र जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांनी सबंध राज्‍यापर्यंत पोहोचून सांडपाणी व्‍यवस्‍थापनाचा सोपा पर्याय जनतेसमोर ठेवला आहे. म्‍हणूनच महाराष्‍ट्र राज्‍यात नांदेड पॅटर्न म्‍हणून ही मोहिम जशी राबविली जात आहे. आम्‍ही देखील या तंत्रज्ञानाचा अभ्‍यास केला असून हे तंत्रज्ञान हरियाणा राज्‍यात राबविण्‍यात येणार असल्‍याचे मुख्‍य अभियंता शंकर जिंदल यांनी सांगितले.       प्रारंभी ग्राम पंचायतीच्‍या वतीने उपस्थित मान्‍यवरांचा शॉल व बुके देऊन सत्‍कार करण्‍यात आला. सरपंच बळी पाटील यांनी कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात डासमुक्‍त गाव अभियानाची माहिती दिली. त्‍यानंतर गावात राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमांची हरियाणा टीमने पाहणी करुन समाधान व्‍यक्‍त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश्‍वर नळगीरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप जायभाये यांनी मानले.यावेळी सरपंच बळी पाटील, उप सरपंच चंद्रकांत हनवते, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, दिगांबर पाटील, पत्रकार गणेश ढेपे, संतोष भरकडे, मुख्‍याध्‍यापक एस.बी.नळगीरे, ए.व्‍ही.कोत्‍तावार, डी.व्‍ही.जायभाये, एस.डी.कवटीकवार, एस.आर.पांडूर्णी यांच्‍यासह गावक-यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 

No comments: