Sunday, 27 December 2015

आरोग्‍य संपन्‍नतेसाठी डासमुक्‍त अभियानाची गरज – प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांचे प्रतिपादन




                           नांदेड,26- ग्रामस्‍थांच्या आरोग्‍यासाठी केंद्र अणि राज्‍य शासन विविध योजना गावस्‍तरावर राबवित असून आपल्‍या आरोग्‍य संपन्‍नतेसाठी डासमुक्‍त अभियानाची काळाची गरज आहे असे प्र‍तिपादन निर्मल ग्राम प्रणेत्‍या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. लोहा तालुक्‍यातील नगारवाडी येथे घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या.

       यावेळी लोहा पंचायत समितीच्‍या सभापती सोनालीताई ढगे, चित्रलेखा गोरे, अभियंता विशाल कदम, सरपंच व्‍यंकटराव जायभाये, पमला मुंडे, बाबर गुरुजी, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष नारायण जायभाये, बालाजी जायभाये, मारोती जायभाये, संजय जायभाये, मंडळ अधिकारी बोधगीरे, ग्रामसेवक पी.एम.शंकरे आदींची उपस्थिती होती.

       पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, गावस्‍तरावर कायमस्‍वरुपी स्‍वच्‍छता राहावी यासाठी केंद्र शासनाच्‍या वतीने शौचालय बांधकामाची मोहिम हाती घेण्‍यात आली आहे. त्‍याचबरोबर राज्‍य शासनाच्‍या संत गाडगेबाबा ग्रामस्‍वच्‍छता अभियानातून विविध योजना गावस्‍तरावर राबविल्‍या जात आहेत. या अभियानात ग्रामस्‍थांनी पुढाकार घेऊन कामे करणे आवश्‍यक आहेत. गावातील सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी नांदेड जिल्‍हयातला टेंभूर्णी पॅटर्न डासमुक्‍त गाव अभियान म्‍हणून राज्‍यात मान्‍यता मिळाली आहे. नगारवाडी येथील ग्रामस्‍थांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपले गाव डासमुक्‍त करावे. यातून भूगर्भातील पाणी पातळी वाढेल शिवाय साचणा-या डबक्‍यातून डासांची होणारी निर्मिती थांबून आरोग्‍य संपन्‍नतेचे वातावरण गावात तयार होईल. यासाठी ग्रामस्‍थांनी पुढाकार आवश्‍यक असल्‍याचे मत निर्मल ग्राम प्रणेत्‍याप्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी व्‍यक्‍त केले. याप्रसंगी डासमुक्‍त अभियानाच्‍या शोषखड्डयाचा शुभारंभ प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्‍यक्‍ती, महिला व गावकरी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 

No comments: