Wednesday, 30 December 2015

नांदेड जिल्‍हयातील सर्व गावांमध्‍ये स्‍वच्‍छता संकल्‍प दिवस साजरा करण्‍यात येणार - उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड



                      नांदेड,30- ग्रामीण भागांना स्‍वच्‍छता क्षेत्रात प्रोत्‍साहीत करण्‍यासाठी राज्‍य शासनाच्‍या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान मोठया प्रमाणात राबविण्‍यात येते. या अभियानांतर्गत आज गुरुवार दिनांक 31 डिसेंबर रोजी जिल्‍हयातील सर्व गावांमधून स्‍वच्‍छतेसाठी संकल्‍प दिवस साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी व स्‍वच्‍छता विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड यांनी केले आहे.
      संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियान दिनांक 2 ऑक्‍टोंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्‍ये राबविण्‍यात येते. या तीन महिन्‍याच्‍या कालावधीत स्‍वच्‍छतेचा प्रचार- प्रसिध्‍दी, गवंडी प्रशिक्षण, ग्राम सफाई, घनकचरा व सांडपाणी व्‍यवस्‍थापन, वैयक्तिक स्‍वच्‍छता, हात धुवा मोहिम, शाळा-अंगणवाडी स्‍वच्‍छता, पाणी शुध्‍दता, माता बालसंगोपन, राथरोग प्रतिबंध, शौचालय बांधकाम इत्‍यादी उपक्रम गावस्‍तरावर राबविण्‍यात येतात. या अभियानाचा शेवट आज 31 डिसेंबर रोजी करण्‍यात येत आहे. आजचा दिवस स्‍वच्‍छतेसाठी संकल्‍प दिवस म्‍हणून साजरा करण्‍यात येणार आहे. आपले गाव स्‍वच्‍छ व निर्मल करण्‍यासाठी गावक-यांनी संकल्‍प करणे अपेक्षीत आहे. यासाठी गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, मिनी बिडीओ, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी नियोजन करुन गावपातळीवर हा दिवस साजरा करावा.
संत गाडगेबाबा ग्राम स्‍वच्‍छता अभियानात स्‍वच्‍छ ग्राम पंचायतींसाठी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्‍कार, दलित वस्‍ती सुधार अभियानामध्‍ये शाहु फुले आंबेडकर पुरस्‍कार देण्‍यात येतो. स्‍वच्‍छ शाळेसाठी सानेगुरुजी स्‍वच्‍छ शाळा पुरस्‍कार तर स्‍वच्‍छ अंगणवाडीसाठी क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले पुरस्‍कार देण्‍यात येतो. सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी स्‍व.वसंतराव नाईक पुरस्‍कार, कुटूंब नियोजनासाठी स्‍व. आबासाहेब खेडकर पुरस्‍कार, सा‍माजिक सलोख्‍यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्‍कारांनी राज्‍य पातळीपर्यंत ग्राम पंचायतींचा सन्‍मान करण्‍यात येतो.
      यानिमित्‍त सरपंच, ग्राम पंचायतीचे सदस्‍य, तंटामुक्‍त समिती, महिला बचतगट, गावस्‍तरावरील विविध समित्‍या, युवक-युवती मंडळ, स्‍वंयसेवी संस्‍था, शाळा, अंगणवाडी आदींनी सहभागी होऊन आपले गाव स्‍वच्‍छतेत शाश्‍वत ठेवण्‍यासाठी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. 

No comments: