श्री खंडेरायाच्या यात्रेच्या सुनियोजनातून माळेगावाचे वैभव वाढवावे - आ. प्रताप पाटील चिखलीकर
[वार्ताहर व्हि,के,कतरे,पांगरेकर]
श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची यात्रा समृद्ध व्हावी, त्यातून माळेगावचे वैभव वाढावे यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. असे निर्देश आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी दि.१३ रोजी दिले. ते माळेगाव येथे आयोजित श्री खंडेरायाची यात्रा ०८ ते १२ जानेवारी दरम्यान होणार्या यात्रा पुर्वतयारीसाठी माळेगाव येथील जिल्हा परिषद विश्रामगृहाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या बैठकीस मंचावर जि.प.चे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती दिनकर दहीफळे, समाज कल्याण समिती सभापती स्वप्नील चव्हाण, लोहा पंचायत समितीच्या सभापती सौ. सोनाली ढगे, कंधार पंचायत समितीचे सभापती बालाजी पांडागळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री प्रविण पाटील-चिखलीकर, गणेश सावळे, दशरथ लोहबंदे, सौ. कृशावर्त भिसे, कावेरी भालेराव, लोहा पंचायत समितीचे उपसभापती रोहीत पाटील, माळेगावचे सरपंच गोविंद राठोड, आनंदराव गुंडले, लोहा- कंधार परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबसिंह राठोड, उपविभागीय अधिकारी अश्र्विनी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर, यात्रा समितीचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी यु. बी. कोमवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, बालाजी शिंदे, जिल्हा कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ, मोहन गोहोत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, कृषि, महावितरण, उत्पादन शुल्क तसेच आरोग्य आदी विभागांच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, माळेगावची यात्रा दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे. हे जगासमोर नेण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत. येणाऱ्या भाविकांना आणि माळेगावमधल्या स्थानिकांनाही यात्रेच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी वेळीच योग्य नियोजन करावे. माळेगावच्या यात्रेचे वैभव जपणे आणि ही यात्रा पुढच्या पिढीपर्यंत पोहचेल, ती वाढेल असा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पारंपारिक कुस्ती स्पर्धा, लोककला तसेच विविध उपक्रमांच्या आयोजनात जिल्ह्यातील मान्यवर आणि त्या-त्या क्षेत्रातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे, त्यांना पंच म्हणून निमंत्रित करावे. यात्रेत कृषी व पशूसंवर्धन विभागाची भुमिका महत्त्वाची आहे. त्यातून शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहचवता येते. यासाठी कृषि क्षेत्रातील विविध घटकांना यात्रेसाठी निमंत्रित केले जावे.
यात्रेसाठी भाविकांना एस. टी महामंडळाने पुरेश्या बसेस आणि चांगली सेवा द्यावी. महावितरणने यात्रेच्या ठिकाणी अखंडीत विज पुरवठा देण्यासाठी माळेगावच्या यात्रेसह या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. आरोग्य विभागाने तत्पर आणि पुरेश्या व चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सुविधांबाबत दक्ष रहावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रेसाठीच्या प्रमुख रस्त्यांची डागडुजी वेळेत करावी. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने यात्रा परिसरातील सोयी-सुविधांबाबत वेगाने प्रयत्न करावेत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. यात्रेच्या नियोजनाबाबत आनंदराव गुंडले यांचेही समयोचित भाषण झाले.
बैठकीच्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद जोशी यांना आदरांजली वाहण्यात आली. यात्रा समितीचे सचिव श्री. कोमवाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विभाग निहाय यात्रेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केली. पोलीस दलाच्याच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वीरकर यांनी बंदोबस्ताची माहिती दिली. यात्रा काळात चोख बंदोबस्त राहील. त्यासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांसह पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध राहील असे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत माळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्यांसह, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आदींसह उपस्थिती नागरिकांनाही चर्चेत भाग घेतला व सूचना केल्या. राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क यांसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य, बांधका, पशूसंवर्धन, कृषी आदी सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.
No comments:
Post a Comment