नांदेड-16, गावाची पत आणि प्रतिष्ठा वाढवायची असल्यास गावात कायमस्वरुपी स्वच्छता असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वच्छतेत गाव शाश्वत ठेवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन निर्मलग्राम प्रणेत्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले.
लोहा तालुक्यातील वाका येथे बुधवार दिनांक 16 डिसेंबर रोजी शौचालय बांधकामाचा शुभारंभ प्रणिताताई देवरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सरपंच आबाराव हंबर्डे, पंचायत समितीच्या सभापती सोनालीताई ढगे, गंगाधन नाईकवाडे, दत्ता हंबर्डे, बापुराव पांचाळ, चक्रधर हंबर्डे, गोविंद हंबर्डे, भाऊराव हंबर्डे, स्वच्छतातज्ञ विशाल कदम, मिनी बिडीओ धनाजी धर्मेकर, ग्रामसेवक अभिजित भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, गावस्तरावरील स्वच्छतेसाठी केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन तर राज्य शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येते. यात अनुदानासह प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावात 100 टक्के शौचालय असतील तर गावातील दुर्गंधी नाहीशी होऊन होणारे अनेक आजार टाळता येऊ शकतात. महिलांची कुचंबना थांबविण्यासाठी व लहान मुलांवर स्वच्छतेचे योग्य संस्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ही मोहिम यशस्वी करावे, असे आवाहन निर्मलग्राम प्रणेत्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी केले. यावेळी गावातील प्रतिष्ठीत नागरीक व महिला यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment