नांदेड-15, गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डयांचा उपक्रम राबविल्यास गाव डासमुक्त होऊन गावात स्वच्छता नांदेल, असे प्रतिपादन निर्मलग्राम प्रणेत्या प्रणिताई देवरे-चिखलीकर यांनी केले.
कंधार तालुक्यातील नवघरवाडी येथे मंगळवार दिनांक 15 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच रेखा कैलासराव नवघरे, चित्रलेखा गोरे, भगवान राठोड, संजय केकाटे, स्वच्छतातज्ञ विशाल कदम, उपसरपंच दिनानाथ गोट्टमवाड, कौशल्याबाई नवघरे, पार्वतीबाई नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागात सांडपाण्याचा मोठा प्रश्न असून यामुळे मच्छरांची पैदास होऊन अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हे आजारपण टाळण्यासाठी शोषखड्डा हा सर्वोत्तम मार्ग असून घरातील सांडपाण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने शोषखड्डा तयार करुन पाणी जमिनीत मुरवावे. तसेच शौचालयाचा वापर करुन गावात होणारी दुर्गंधी थांबविल्यास गावातील नागरीकांचे आरोग्यमानात सुधारणा होईल. यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छतेच्या कामी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निर्मलग्राम प्रणेत्या प्रणिताई देवरे-चिखलीकर यांनी केले.
प्रारंभी ग्राम पंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नवघरवाडी गावात 90 कुटुंब असून 12 कुटुंबांनी शौचालय बांधकाम करणे शिल्लक आहे. येत्या 31 डिसेंबर पर्यंत गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी प्रणिताई देवरे-चिखलीकर यांच्याहस्ते शोषखड्डयांचा शुभारंभ करुन गावात वृक्षारोपन करण्यात आले. याप्रसंगी बचतगटाच्या गयाबाई शेळके, जनाबाई गट्टमवाड, जिजाबाई शेळके, ग्रामसेविका स्वप्नाली चव्हाण यांच्यासह गावातील बचतगट, महिला व पुरुष यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment