Thursday, 15 October 2015

आज जागतिक हात धुवा दिवसानिमित्‍त मिलिंद व्‍यवहारे यांचा विशेष लेख देत आहोत.





संयुक्‍त राष्‍ट्र संघाने आरोग्‍य आबाधित राहावे यासाठी आंतरराष्‍ट्रीय हात धुवा दिवस 15 ऑक्‍टोबर हा दिवस जगात साजरा करण्‍यात येतो. स्‍वच्‍छता आणि आरोग्‍यशास्‍त्र हया गोष्‍टी लोकांच्‍या आरोग्‍यासाठी व विकासासाठी आवश्‍यक आहेत. दरवर्षी लाखो लोग अस्‍वच्‍छतेमुळे मरण पावतात. विशेष करुन मुलांमध्‍ये स्‍वच्‍छतेचा प्रसार करण्‍यासाठी समर्पित प्रयत्‍नांची गरज आहे. विशेषत्‍वाने साबनाचा वापर करुन हात धुने व स्‍वच्‍छतागृहाचा वापर करण्‍यासाठी शाळेतील मुलांना व त्‍यामार्फत समाजाला जागरुक करण्‍यासाठी एका कल्‍पक राष्‍ट्रीय मोहिमेचा प्रारंभ करण्‍यात आला आहे.
      आपणां सर्वांना हे माहित आहे की, जिवाणू, विषाणू, परोपजिवी यासारख्‍या अनेक जिवाणूंपासून अतिसार व इतर रोग होतात. मानवी विष्‍ठा ही अतिसाराच्‍या रोग वाहकाचा प्रमुख स्‍त्रोत आहे. हे रोग वाहक विषमज्‍वर, कॉलरा, जंतांचा संसर्ग, चिकन गुनीया स्‍वाईनफ्ल्‍यू व श्‍वसन संस्‍थेशी संबंधित काही रोग यांचाही स्‍त्रोत आहे. एक ग्रॅम विष्‍ठेमध्‍ये एक कोटी विषाणू, दहा लाख जिवाणूं व एक हजार परोपजिवी अंडी व कोष असतात. माशा, हात, द्रवपदार्थांमधून या रोगांचा प्रसार मोठया प्रमाणात पसरतो.
      इ.स.1840 मध्‍ये डॉ.ईगनाज, सेमेलवाईस यांनी हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लावला. युरोपमध्‍ये एका शैक्षणीक इस्पितळात ते डॉक्‍टर होते. दवाखाण्‍यात बाळांतपणासाठी येणा-या महिलांचा मोठया प्रमाणात मृत्‍यू होत होता. एका प्रयोगामध्‍ये त्‍यांनी सर्व वैद्यकीय विद्यार्थ्‍यांना व इतर डॉक्‍टरांना स्‍त्रीला हात लावण्‍यापूर्वी स्‍वच्‍छ हात धुण्‍यास सांगितले. केवळ या हात धुण्‍यामुळे प्रसूती विभागातील मृत्‍यू जवळ-जवळ 50नी कमी झाले. अशा रितीने हात धुण्‍याचा महत्‍वाचा शोध लागला. जे लोक नियमित हात स्‍वच्‍छ ठेवतात त्‍यांचे आरोग्‍य नेहमीच चांगले राहते. शाळेत जाणा-या विद्यार्थ्‍यांची संख्‍या मोठी असल्‍यामुळे त्‍याच्‍या मार्फत घरा-घरात हात धुण्‍याचा व स्‍वच्‍छतेचा संदेश देण्‍यात येणार आहे. स्‍वच्‍छतेच्‍या सवयी शाळेतून लागाव्‍यात यासाठी मुलां-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृहाची सोय करण्‍यात आली आहे. ते स्‍वच्‍छ व वापरात राहण्‍यासाठी शाळेसह गावक-यांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.
     हात धुण्‍यासाठी शाळा व गावपातळीवर मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यात येत आहे. पुष्‍कळ लोकांना हात कसे धुवावे हे माहितीच नाही. हात धुण्‍याच्‍या योग्‍य पध्‍दतीचे पाच टप्‍पे आहेत. सुरुवातीला पाण्‍याने हात ओले करावे व त्‍यानंतर हाताला साबण लावावी. हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. बोट एकमेकांत अडकवून ती एकमेकांवर घासावी. उजव्‍या हाताच्‍या बोटांची टोके डाव्‍या हाताच्‍या तळव्‍यावर गोल फिरवून घासावी आणि त्‍यानंतर तीच क्रिया दुस-या हाताने करा म्‍हणजे नखं स्‍वच्‍छ होतील व पाणी वापरुन हात खळवळून घ्‍यावेत.
     या पाच टप्‍प्‍याव्‍दारे हाताची स्‍वचछता करणे गरजेचे आहे. याचे प्रात्‍यक्षिक प्रत्‍येक शाळेतून आज दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात येणार आहेत. जिल्‍हयातील सर्व ग्राम पंचायती, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडयांमधून कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. हात धुण्‍याच्‍या प्रात्‍यक्षीकातून लोकांना हात धुण्‍याची सवय लागेल. शालेय विद्यार्थ्‍यांमार्फत घरातील सर्व सदस्‍यापर्यंत हा संदेश जाणार आहे. या संदशाचे सर्वस्‍तरातून वापर झाला तर सर्वांचे हात स्‍वच्‍छ राहतील. परिणामी रोगराईस आळा बसेल यात शंका नाही.
मिलिंद व्‍यवहारे
जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक
जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन
जिल्‍हा परिषद नांदेड.   

No comments: