पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पवारांची प्रकृती ठणठणीत असल्याचं कालच डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यांना आज रुबी हॉल क्लिनीक रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पवारांनी रुग्णालयातून बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, “डॉक्टरांनी 8-10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, एकाच जागी इतके दिवस बसण्याची सवय नाही. पुढील दोन महिन्यात मला एकही सुट्टी नाही. विश्रांतीचं कसं करायचं ते बघू. पण काळजी घेऊ”. पवार येत्या काही दिवसात मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळेच आपल्याला सुट्टी नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पवार आज पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले.
पवारांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरत होत्या. मात्र पवारांनी स्वत:च ट्विट करून आपण ठणठणीत असल्याचं म्हटलं होतं.

No comments:
Post a Comment