Sunday, 31 January 2016

नमस्कार लाईव्ह ३१-०१-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पठाणकोट हल्ल्यामुळे भारत-पाक चर्चेला खीळ - नवाज शरीफ 
२- इराणचे राष्ट्राध्यक्षांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्यापूर्ण नग्न पुतळ्यांना ठेवले झाकून 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- रोहित वेमुला हा दलित नव्हताच – सुषमा स्वराज 
४- पुढील निवडणुकीत जनता मोदींना धूळ चारेल - यशवंत सिन्हा 
५- व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले 
६- आ. बच्चू कडू यांची गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट; अपंग व्यक्तींच्या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- 'शनिचौथऱ्यावर प्रवेश न दिल्यास महिलांनीच बहिष्कार टाकावा' 
८- नाशिक : 'आमची मुलगी तरुणासोबत पळाली, सुरेश प्रभू, मदत करा' 
९- हॉटेल सुरु करणं आता आणखी सोपं, गृह खात्याच्या 5 परवानग्या रद्द करण्याचा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- देवनारच्या आगीप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा 
१२- मुंबई; मंडपात हुंड्याची मागणी, लग्नाच्या बेड्याऐंवजी पोलिसांच्या बेड्या 
१३- दादरला धावती लोकल पकडताना 45 वर्षीय इसमाचा मृत्यू 
१४- हिंगोली; वसतिगृहात विद्यार्थीनींना दिली जाते सडकली फळं 
१५- वर्धाः नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात होऊन २ जण जागीच ठार तर १ जखमी 
१६- मध्य प्रदेश; सागर जिल्ह्यातून पोलिसांनी १ हजार किलो स्फोटके, १३२ डिटोनेटर्स, इतर साहित्य जप्त, ३ अटक
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याची भारताला संधी 
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१८- रेशीम उत्पादकांना स्वत:च्या शेतावरच मिळणार मंजुरी 
१९- आजपासून नांदेडला शिक्षक साहित्य संमेलन 
२०- मुदखेड; रेतीच्या दोन टिप्परला ४० हजाराचा दंड 
२१- राजकारणात चांगल्या लोकांची गरज - आ. चिखलीकर 
२२- करवसुलीत दिरंगाई करणाऱ्या ८० कर्मचाऱ्यांचे वेतन आयुक्तांनी रोखले 
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
आकाश ठाकूर, फेरोज लाला, चंद्रपाल सिंघ देवरा, सुदर्शन गोरने, महेश देशपांडे, गोपाल अग्रवाल 
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
सौंदर्य हे वस्तुत नसते तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते
(प्राजक्ता मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4

==================================================================
==================================================================


'शनिचौथऱ्यावर प्रवेश न दिल्यास महिलांनीच बहिष्कार टाकावा'



अहमदनगर : शनिशिंगणापूरला महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळत नसेल तर महिलांनीच शनीवर बहिष्कार टाकावा आणि मंदिरात जाऊ नये, असं आवाहन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी केलं आहे. ते अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी बोलत होते.
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरातन काळापासून स्त्रियांना दोषी ठरवलं जात असल्याचा आरोप मंजुळेंनी केला. तसेच स्त्री पुरुषापेक्षा उजवीच आहे, मात्र धर्मव्यवस्थेनं आतापर्यंत स्त्रियांचं शोषणच केलं आहे, असं मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं.
महाभारत, रामायणापासून स्त्रीलाच दोषी ठरवण्यात आलं, त्यामुळे स्त्रियांनी व्यक्त होण्याची गरज नागराज मंजुळे यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, औरंगाबाद हायकोर्टानं अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना शनि शिंगणापूर प्रकरणी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.
औरंगाबादेतल्या डॉ. वसुधा पवार यांनी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश आणि पूजेचा समान अधिकार मिळावा यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांसह, मुंबई धर्मादाय आयुक्त आणि राज्याच्या विधी न्याय खात्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली.

================================================

देवनारच्या आगीप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा



मुंबई : देवनार डंम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे तीनही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर तातडीनं ही कारवाई करण्यात आली.
अग्निशमन दलाच्या वतीनं जेट कूल सोल्युशन या नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग अग्निशमन दलाद्वारे करण्यात आला. कचऱ्यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला गेला.
आगीची तीव्रता मोठी नसली तरी हवेच्या गतीमुळे आग धुमसत असल्यानं वातावरणात प्रचंड धूर पसरला होता. खबरदारीचा उपाय म्हणून देवनार परिसरातील सर्व शाळा आणि कॉलेजना प्रशासनाने दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
धुरामुळे श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर काळा चष्मा आणि तोंडावर ओला रुमाल ठेवावा असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

================================================

'आमची मुलगी तरुणासोबत पळाली, सुरेश प्रभू, मदत करा'

नाशिक : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची तत्परता पुन्हा एकदा समोर आली आहे. घरातून पळून गेलेले अल्पवयीन प्रेमी युगल सुरेश प्रभूंच्या मदतीमुळे पालकांच्या ताब्यात आलं आहे.
पश्चिम बंगालच्या हावडामध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीच्या पित्याने शनिवारी प्रभू यांना “आमची मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली आहे. ते रेल्वेने पळाल्याचा संशय आहे. मदत करा”, असं ट्वीट केलं. ट्वीटमध्ये मुलीचा फोटो आणि मोबाईल नंबरही देण्यात आला होता. भुसावळजवळ ट्रेन असल्याचा अंदाज त्यात व्यक्त केला होता.
हावडाहून गीतांजली एक्स्प्रेसने हे प्रेमीयुगल मुंबईला यायला निघालं होतं. प्रभू यांनी तत्काळ आरपीएफ जवानांना युगुलाला शोधण्याचे आदेश दिले. त्यानंतर एका तासात ही कारवाई झाली. या प्रेमीयुगलला नाशिक रेल्वे स्थानकात ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी दोघांच्या घरी कळवल्यानंतर विमानाने दोन्ही अल्पवयीन मुलांचे पालक विमानाने मुंबईला आले. दोन्ही मुलं आपापल्या आईवडिलांच्या ताब्यात सुखरुप असल्याची माहिती आहे.

================================================

मुंबई; मंडपात हुंड्याची मागणी, लग्नाच्या बेड्याऐंवजी पोलिसांच्या बेड्या


नवी मुंबई : ऐन लग्नमंडपातच हुंड्याची मागणी केल्यानंतर लग्न मोडल्याची संतापजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. यावेळी वरपक्षातील मंडळींनी वधूच्या मामाला बेदम मारहाणही केली. याप्रकरणी रबाळे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक झाली आहे.
ऐरोलीत राहणाऱ्या एका युवतीचा विवाह शुक्रवारी वडाळ्यातील शैलेश गुप्ताशी होणार होता. लग्न ठरल्यानंतर मुलीकडच्यांनी गुप्ता परिवाराला दोन लाखांचा हुंडाही दिला होता. मात्र ऐन लग्नातच नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी आणखी एक लाख रुपयांची मागणी केली.
या कारणावरुन दोन्ही पक्षात वाद झाला आणि त्याच रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी मुलाकडच्या काही नातेवाईकांनी मुलीच्या मामाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी नवरदेवासह पाच जणांना अटक केली आहे.
================================================

हॉटेल सुरु करणं आता आणखी सोपं, गृह खात्याच्या 5 परवानग्या रद्द करण्याचा निर्णय


मुंबई : ज्यांना हॉटेल व्यवसायात उतरायचं आहे, अशांना फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. हॉटेल उद्योगाची उभारणीची प्रक्रिया आता आणखी सोपी केली आहे. हॉटेल उद्योग उभारण्यासाठी गृह विभागाशी संबंधित 5 परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगाला चालना मिळणार आहे.

राज्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ या मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्र्यंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षभरात उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी केल्या आहेत. यापूर्वी उद्योग, नगरविकास, पर्यावरण आदी विभागांच्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली होती. आता या मोहिमेला गृह विभागाकडूनही पाठबळ मिळाले आहे.

गृह विभागाने मुंबई पोलिस अधिनियमांतर्गत तयार केलेल्या नियमानुसार हॉटेल व आदरातिथ्य उद्योगांना आता खाद्य नोंदणी प्रमाणपत्र, स्विमिंग पूल परवाना, सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणासाठी परवाना पीपीईएल – ए तसेच पीपीईएल – बी आणि सादरीकरण परवाना या पाच परवानग्या घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. या परवानग्या रद्द करण्यात आल्यामुळे हा उद्योग सुरू करण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी व लागणारा विलंब कमी होणार असून अनावश्यक कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही.

दरम्यान, राज्यात आता हॉटेल व्यवसाय करताना महापालिकेने दिलेले परवाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवान्यानंतर हॉटेल व आदरातिथ्य व्यवसाय सुरू करता येईल.


================================================

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याची भारताला संधी


सिडनी : अॅडलेड आणि मेलबर्नमध्ये कांगारुंना लोळवल्यावर धोनीची टीम इंडिया आता ट्वेन्टी 20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉशचा दणका देण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामधला तिसरा ट्वेन्टी20 सामना आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून आठ मिनिटांनी या लढतीला सुरुवात होईल. सिडनीच्या मैदानातच टीम इंडियाने वन डे मालिकेतला अखेरचा सामना जिंकण्याची करामत केली होती. त्यानंतर धोनी ब्रिगेडचं नशीबच पालटलं आहे.

टीम इंडियासमोर आता हाच विनिंग फॉर्म कायम राखण्याचं आव्हान आहे. तर जसप्रित बुमरा आणि हार्दिक पंड्यासारख्या नवख्या खेळाडूंसाठी आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवण्याची ही आणखी एक संधी ठरु शकते.
================================================

दादरला धावती लोकल पकडताना 45 वर्षीय इसमाचा मृत्यू

मुंबई : धावत्या लोकलमध्ये चढण्याची घाई एका प्रवाशाच्या जीवावर बेतली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धावत चढण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरुन पडून एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

शफीउद्दीन अब्दुल गनी दादर रेल्वे स्टेशनवर सकाळी 6 च्या सुमारास आपल्या कुटुंबासोबत लोकल पकडत होते. पायऱ्या उतरुन शफीउद्दीन प्लॅटफॉर्म आले आणि चढणार तोच लोकल सुटली. मात्र कसंबसं त्यांनी आपली पत्नी आणि मुलीला लोकलमध्ये चढवलं. मात्र स्वतः चढण्यापूर्वीच लोकलने वेग घेतला. ते धावत लोकलसह जात असतानाच प्लॅटफॉर्म संपला आणि ते पोकळीत कोसळले.

ट्रेनमुळे कापलं गेल्याने शफीउद्दीन यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज हाती आलं आहे. प्लॅटफॉर्म संपतो त्याठिकाणी बॅरिकेट लावले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, असं म्हटलं जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर धावत्या एक्स्प्रेसमधून उतरताना एका महिलेचा पडून मृत्यू झाला होता. रेल्वे अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
================================================
वसतिगृहात विद्यार्थीनींना दिली जाते सडकली फळं !


हिंगोली – 30 जानेवारी : शहरातील अकोला बायपास भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींना निकृष्ट जेवण देण्यात येत असून कच्च्या चपात्या, सडलेली फळं दिली जात आहेत. शिवाय कर्मचार्‍याकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनींनी वसतिगृहातच आंदोलन सुरू केलंय.
विद्यार्थिनीच्या आंदोलनाची दाखल घेत वसतिगृहाला आमदार तानाजी मुटकुळे आणि समाज कल्याण उपयुक्त छाया कुलाल यांनी भेट देऊन मुलींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुलींनी वसतिगृहात मिळत असलेल्या वागणुकीचा व निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रार केली. काही कर्मचारी मुलींना अश्लील भाषेत आणि जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा आरोप मुलींनी केला. त्या ठिकाणी मुलींचे दोन गट निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. काही मुली सुविधा मिळत असून कर्मचारी चांगले असल्याचे सांगत होत्या तर जास्त संख्या असलेल्या गटातील मुली व्यथा मांडत होत्या. मुलींना देण्यात येत असलेले सडके सफरचंदही मुलींनी दाखविले.
मुलींना चांगल शिक्षण,चांगल आरोग्य येईल शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली.
================================================
रोहित वेमुला हा दलित नव्हताच – सुषमा स्वराज


गेल्या काही दिवसापासून रोहितच्या आत्महत्या प्रकरणामुळे केंद्रातील राजकारण प्रभावित झाले आहे. त्यात आता हैदराबाद विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, रोहित वेमुला हा दलित नव्हताच असा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे. ‘या प्रकरणात जे तथ्य समोर आले आहे आणि जी माहिती मला मिळाली आहे, त्यानुसार रोहित हा दलित नव्हताच. मात्र काही जणांनी त्याला दलित म्हणून या संपूर्ण प्रकरणाला सांप्रदायिक रंग दिला आहे. दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही’ असे स्वराज यांनी म्हटले आहे. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाला आता आक्रमक पवित्रा आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांनी देखील रोहितच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करत आपला देश कुठे चालला आहे असे विचारले आहे. शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे एक दिवसाच्या उपोषणावर बसले होते. त्यांच्या या दौऱ्याला अभाविपने विरोध केला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ठेवत रोहितसह पाच दलित विद्यार्थ्यांवर ऑगस्ट २०१५ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्याच नैराश्यातून रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. रोहितच्या आत्महत्येपासून दोषींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. 
================================================

पठाणकोट हल्ल्यामुळे भारत-पाक चर्चेला खीळ - नवाज शरीफ


इस्लामाबाद : पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे हे वक्तव्य पाकिस्तानी लष्कराला आणि त्यातही लष्करप्रमुख राहील शरीफ यांना संदेश म्हणून मानले जात आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता चर्चा व्हावी यासाठी नवाज शरीफ प्रयत्नशील होते; पण लष्कर अशा चर्चेला अनुकूल नव्हते. त्याचवेळी पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेचा इन्कारही केला जात नाही.
पठाणकोट हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना नवाज शरीफ म्हणाले की, भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. या हल्ल्यामागील सूत्रधार
आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी भारत करीत आहे. या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे.
पठाणकोट हल्ल्यामागे मसूदच्या असलेल्या भूमिकेचा पुरावा भारताने पाकिस्तानला दिला आहे; पण तीन आठवडे होऊनही पाकिस्तानने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील विदेश सचिवांची चर्चाही लटकली आहे. पाकिस्तानने ठोस कारवाई केल्यानंतरच चर्चा सुरू केल्याचे संकेत भारत सरकारने दिले आहेत. लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना शरीफ पुढे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्याची चौकशी लवकरच पूर्ण होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकस्मिकरीत्या पाकिस्तानला भेट दिल्यानंतर उभय देशांतील संबंध योग्य दिशेने जात होते; पण पठाणकोट हल्ल्याने ही प्रक्रिया थांबली. परंतु आता दहशतवादी पराभूत झाले असून, ते निराश झाले आहेत. आपली उपस्थिती दाखविण्यासाठीच ते अशा घटना घडवून आणत आहेत.
भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. पठाणकोट हल्ल्यासाठी आमच्या जमिनीचा वापर करण्यात आला काय? हे शोधून काढण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते काम करू .
================================================

पुढील निवडणुकीत जनता मोदींना धूळ चारेल - यशवंत सिन्हा



जनतेसोबत संवादाच्या अभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारसारखी स्थिती होईल, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील निवडणुकीत भारतीय जनता त्यांना धूळ चारेल, असा टोलाही त्यांनी मोदींचे नाव न घेता लगावला. पणजी येथील एका महाविद्यालयात आयोजित ‘डिफिकल्ट डायलॉग‘ या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी मोदींचा उल्लेख न करता सरकारवर टीकास्त्र सोडले. 
' जनतेशी संवाद साधणे, ही भारतीय लोकशाहीची मोठी ताकद आहे. पण, सध्या तसे होताना दिसत नाही... संवाद बिलकूल राहिलेला नाही. थोड्याफार चुका होऊ शकतात, पण सध्याची स्थिती बघता काळजी वाटते' असे सिन्हा म्हणाले. ' भारतीय समाज सगळं लक्षात ठेवतो आणि याच गोष्टीचा भविष्यात फटका बसू शकतो. संवादावर विश्वास नसणा-यांना भारतातील नागरिक पुढील निवडणुकांमध्ये धूळ चारतील. इंदिराजींच्या काळातही अशीच डोळेझाक केली होती आणि त्यावेळी सरकार फक्त १९ महिनेच टिकू शकले होते,' याची आठवणही सिन्हा यांनी करून दिली.
================================================

व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले


 एअर इंडियाच्या अधिका-यांनी आपल्याशी गैरवर्तन करत फ्लाईटमधून खेचून बाहेर काढल्याचा आरोप एका अपंग महिलेने लावला आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीत असोसिएट प्रोफेसर असणा-या अनित घई यांच्या सांगण्यानुसार, एअर इंडियाने त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था तर केली नाहीच आणि त्याबद्दल विचारणा केली असता अधिका-यांनी त्यांना विमानाच्या बाहेर काढले. मात्र एअर इंडियाच्या अधिका-यांनी हे आरोप फेटाळून लावत घई यांना व्हील चेअर देण्यात आली होती, असा दावा केला आहे. 
काय आहे प्रकरण? 
अनिता शुक्रवारी संध्याकाळी एअर इंडियाच्या 'अलायन्स एअर' फ्लाइटने चार सहका-यांसह डेहराडून येथून दिल्लीला परत येत होत्या. विमान इंदिरा गांधी एअरपोर्टवर उतरल्यानंतर अनिता यांनी फ्लाइट कमांडरकडे व्हील चेअरची मागणी केली, मात्र अर्धआ तास उलटून गेल्यावरही व्हील चेअर मिळाली नाही. अनिता यांनी या संदर्भात पुन्हा पुन्हा मागणी केली असता सुरक्षेचे कारण देत त्यांना व्हील चेअर देण्यास नकार देण्यात आला. आणि अखेर तासाभरानंतर अनिता यांना विमानातून खेचून बाहेर काढण्यात आले. 
एअर इंडियाच्या अधिका-यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आम्ही आमच्या प्रवाशांची व्यवस्थित काळजी घेतो असे स्पष्ट केले. त्यादिवशी विमान थोड्या लांब अंतरावर उतरवण्यात आल्याने व्हील चेअर आणण्यास वेळ लागला. मात्र अनिता यांनी सांगितल्यानुसार कोणतीही घटना घडलेली नाही, उलट आमच्या कर्मचा-यांनी त्यांना उतरण्यास मदतच केली, असे अधिका-यांनी नमूद केले. 
================================================
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्याचे उत्कृष्ट नमुने म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नग्न पुतळ्यांना झाकून ठेवले

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्याचे उत्कृष्ट नमुने म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नग्न पुतळ्यांना झाकून ठेवले गेले, पण यात अब्रू गेली, ती कलासक्त रोम शहराचीच.
आपल्या घरात जर कुणी पाहुणे येणार असतील, तर साहजिकच आपण घर आवरतो. नीटनेटके दिसेल, इतपत घराची झटपट रचना करतो. घरात येणाऱ्या पाहुण्याच्या मनात आपण गबाळे नाहीत, अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हे स्वाभाविकही आहे. तीच गोष्ट देशात येणाऱ्या पाहुण्यांची असते. एखाद्या देशाचा पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे येणार असेल, तर आपणही रस्ते झाडून साफ करतो. पाहुण्यांपुढे आपल्या देशाची प्रतिष्ठा कमी होणार नाही, याची काळजी घेतो. पाहुण्यांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवतो. आपल्या देशाच्या कला-संस्कृतीचे प्रदर्शनही या निमित्ताने घडवतो. कलेच्या माध्यमातून देशाच्या महान परंपरेचा संदेशही देतो. आपल्या देशाला कलेचा उत्तम वारसा कसा लाभलेला आहे, याची साग्रसंगीत माहिती पाहुण्यांना देत असतो. हे झालं सार्वत्रिक चित्र, पण तिकडे इटलीमध्ये वेगळेच घडले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच इटलीच्या दौऱ्यावर गेले. इटलीची राजधानी रोममध्ये पंतप्रधान मतेओ रेन्झी यांच्याशी व्यापारी करारही केला. इराण रूढीप्रिय मुस्लीम राष्ट्र असल्याने, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना अप्रतिष्ठित वाटू नये याची काळजी इटलीने घेतली होती. खरं तर रोमन साम्राज्याची जगाला मोठी देणगी आहेच. ग्रीक शिल्पाकृतीची तर जगभर चर्चा होतच असते. जगाच्या कलाजगताचा अभ्यास करताना रोमच्या कलाकृतींशिवाय अभ्यास पुढे सरकत नाही. ग्रीक शिल्प असो, चित्र असो, त्यांच्या आखीव-रेखीव इमारती असो, या साऱ्यांमध्ये इटलीने एके काळी जगाचे नेतृत्व केले होते, हा इतिहास आहे. ग्रीक थिंकर असो वा पीळदार पुष्ठ स्नायूंचे नग्न पुतळे असो, या कलाकृतींनी जगभर भुरळ पाडली. जगभरचे कलासक्त रसिक रोमची आणि अलीकडच्या काळात पॅरिसची सफर केल्याशिवाय राहत नाहीत, हे तितकेच खरे आहे. इटलीच्या नग्न शिल्पाकृतीचा त्या देशालाही तितकाच अभिमान आहे. जगातील सर्वात जुने शहर असलेल्या रोमने शेकडो लढाया होऊनही शिल्पाकृतींचा वारसा मोठ्या ममत्वाने जपला आहे.
जगाच्या पुरोगामी विचारांची लढाई जिंकणाऱ्या इटलीला परवाच्या घटनेने थोडा कलंक लागला आहे हे मात्र नक्की. इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी आणि इटलीचे पंतप्रधान रेन्झी यांची संयुक्त पत्रकार परिषद रोमच्या कॅपिटोलाइन म्युझियममध्ये ठेवण्यात आली होती. या म्युझियममध्ये प्रवेशाच्या वेळी देखणे नग्न पुतळे होते. रूढीप्रिय रोहानी यांना कदाचित या नग्न पुतळ्यांमुळे अप्रतिष्ठित वाटू शकते, अशी शक्यता लक्षात घेऊन, तिथल्या सांस्कृतिक विभागाने हे नग्न पुतळेच झाकून ठेवले. इराणबरोबर पूर्वी इटलीचे व्यापारी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या इराणवर आर्थिक निर्बंध टाकण्यात आले होते. गेल्याच महिन्यात हे निर्बंध उठविण्यात आले. इराण हा व्यापारासाठी प्रचंड सक्षम असलेला प्रदेश असल्याने, युरोपियन राष्ट्रांनी इराणसाठी पायघड्या घातल्या. त्याची पहिली सुरुवात इटलीच्या दौऱ्यातून झाली. इटलीबरोबर इराणने तब्बल १७०० दशलक्ष युरोचा व्यापारी करार केला. हा करार व्हावा, म्हणून इटलीची धडपड सुरू होती. त्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची तयारी होती. त्याचाच परिणाम म्हणून नग्न शिल्पाकृतीही झाकून ठेवण्यात आल्या, परंतु या घटनेची युरोपात नव्हे, तर जगभर दखल घेतली गेली. सोशल मीडियावर इटलीची खिल्ली उडविण्यात आली.
नग्नतेमध्ये सौंदर्य पहायचे की लैंगिकता, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लैंगिकता ही आदिम भावना आहे. जिथे-तिथे ती दाबण्याचा प्रयत्न झाला. तिथल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली, हा इतिहास सांगतो. या आदिम भावनेला ग्रीक कलाकारांनी सौंदर्याचे अप्रतिम वळण दिले आणि जगानेही त्याचे स्वागत केले. त्या पुढारलेल्या ग्रीकला हे नग्न पुतळे झाकण्याची वेळ का यावी? इतकी व्यापारी हतबलता इटलीवर यावी? या घटनेची जगभरच्या माध्यमांनी नोंद घेतल्यानंतर, दोन्ही देशांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. इटलीच्या पंतप्रधान कार्यालयातून या घटनेचा दुरान्वयानेही संबंध नसल्याने पत्रकच काढण्यात आले. इटलीच्या सांस्कृतिक मंत्र्यांनीही अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलून दिली. इटलीच्या रोहानींचा त्यानंतर फ्रान्सचा दौरा झाला. त्या वेळीही सांस्कृतिक संघर्षांची ठिणगी पडली. फ्रान्सचे पंतप्रधान ओलांद यांनी रोहानी यांच्या आगमनानिमित्त मेजवानी ठेवली होती. त्या भोजनाच्या यादीत फ्रान्सची प्रसिद्ध वाइनही होती. इराणच्या अधिकाऱ्यांनी वाइनला आक्षेप घेतला. फ्रान्सने ती मेजवानीच रद्द केली. या घटनेचीही जगभर दखल घेतली गेली.
फ्रान्सचाही इराणबरोबर व्यापारी करार झाला, पण फ्रान्सने इराणपुढे लाळघोटेपणा केला नाही. त्या पार्श्वभूमीवर इटलीची घटना अधिक गडद झाली. टीकेचा चौफेर मारा झाला. नग्न पुतळे झाकण्याची गरज नव्हती, उलट ते झाकल्यामुळे अधिक अब्रू गेली. इटलीच्या त्या अधिकाऱ्यांवर आता कारवाईची भाषा सुरू झाली आहे, पण ‘हौदसे गई वो बुंदसे नही आती’. कारण इटलीने नग्न सौंदर्य शिल्पे झाकून ‘नंगे को खुदा भी डरता है’ या म्हणीचा जणू प्रत्ययच दिला. इटलीला ज्याचा अभिमान होता, तीच त्यांच्या लज्जेची गोष्ट बनली. यावरून प्रागतिक देशाची अधोगती मात्र झाली, हे म्हणण्याला जागा उरली हेही तितकेच खरे. या घटनेच्या निमित्ताने मानवी श्लील-अश्लीलतेच्या विचारांचे नग्न दर्शन पहायला मिळाले.

No comments: