नागपूर: नागपुरात संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भारतीय जवानांचं मोहन भागवतांनी कौतुक केलं. तर त्याचवेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
“जगाचा पोशिंदा आत्महत्या करतोय आणि आपण नुसते पाहतोय. शेतकरी आत्महत्यामुळे भविष्यात मोठे संकट निर्माण होईल. त्या संकटाचा सामना किमान बळीराजा करु शकेल. शेतकरी त्याची शेती फायद्याची करू शकेल असे तंत्र त्याला शिकविले पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या अनेक असून त्यापैकी काही उपाय सरकारला करायचे आहे. तर काही समाजाला करायचे आहे.” असं भागवत म्हणाले.
“सरकार आपलं कर्तव्य करेल तेव्हा करेल, पण समाज म्हणून आपण आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. आत्मविश्वासाचा अभाव आणि आपल्या पाठीमागे कोणी नाही. या भावनेतून शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहेत.” असं मोहन भागवत म्हणाले.
“जी वस्तू देशात बनू शकते. ती परदेशातून किंवा परकीय कंपनीकडून खरेदी करू नका. जी वस्तू शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकता. ती त्यांच्याकडून खरेदी करा. लग्नात खूप खर्च करण्यापेक्षा खर्च वाचवून ते गरजू व्यक्तींना द्या. अशा छोट्या उपायांनीही काही प्रमाणात बदल होईल. 121 कोटींच्या देशात शेतकऱ्यांची समस्या खूप मोठी नाही. सर्वानी त्यांचे त्यांचे भार उचलले तर नक्कीच समस्येचे हे गोवर्धन पर्वत उचलले जाईल.” असा सल्लाही भागवत यांनी दिला.
दरम्यान, याचवेळी मोहन भागवतांनी विरोधकांवरही निशाणा साधला. ‘संघ नेहमीच धर्मनिरपेक्ष भूमिका घेतं. मात्र, विरोधकांकडून संघावर धर्मनिरपेक्षविरोधी असल्याचा आरोप होतो.’ असं भागवत म्हणाले.

No comments:
Post a Comment