[अंतरराष्ट्रीय]
१- भारत-पाकिस्तानमधील रेल्वे संपर्काचा कालावधी तीन वर्षासाठी वाढवण्यात आला.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- अयोध्येतील राम मंदिर खुलं करणं ही राजीव गांधींची चूक : राष्ट्रपती
३- एका लॉग इनमधून फक्त 6 तिकीटं, एजंटगिरी रोखण्यासाठी रेल्वेचं पाऊल
४- शनी हा देव नव्हेच, तो तर आहे ग्रह; त्याला पळवून लावले पाहिजे - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- हेमा मालिनींनवर मेहरबानी, मुंबईतील कोट्यवधीचा भूखंड अवघ्या 70 हजारात
६- अंदमान दौऱ्यात मुंबई महापौरांचीही हजेरी, दौऱ्यावर 14 लाखांचा खर्च
७- भाडे नियंत्रण कायद्यावरून शिवसेना - भाजपची खडाजंगी
८- पूर्वी शनी चौथर्यावर जाऊन महिला दर्शन घेत होत्या, मग आता का नाही ? – विखे पाटील
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
९- मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर 30-35 फुटांचा मृत मासा
१०- शिर्डी; कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्धाचा मृत्यू
११- मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत
१२- वसई; रुग्णांना फसवणार्या सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
१३- पठाणकोटः विनातिकीट प्रवास करताना रेल्वे पोलिसांनी एका २५ वर्षीय अफगाण नागरिकाला केली अटक
१४- कोल्हापूर :व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या चौघांना अटक
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- 'रँचो' पुन्हा मोठ्या पडद्यावर, लवकरच 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल
१६- दुसरा सामना आणि मालिकाही जिंका
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१७- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी १७५ कोटी ९१ लाख रुपयाचे अनुदान प्राप्त
१८- पन्नास गाड्या, हेलिकॉप्टर घेवून आल्याने कंधारचा विकास होत नाही - चिखलीकरांची टीका
१९- पत्र व्यवहाराबरोबरच पोस्टात एटीएम सुविधा; ३५० खातेदारांना एटीएमचे वाटप
२०- आदिवासी विद्यार्थ्यांचा आंदोलन स्थळीच अभ्यास; वसतिगृहातील जागा वाढविण्याची मागणी
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
पियुष वाटेगावकर, राम जाधव, रितेश बोरोले, त्र्यंबक गंगात्रे, सुरेश मोहिते
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समाजाचे नेतृत्व करणे हे सगळ्यांनाच खूप आवडते,
पण त्यासाठीचे कौशल्य फक्त काहींनाच सापडते..
यशाच्या आकाशात धर्तीवर राहणं, लोकहित पाहणं हे ज्यांना जमलं,
त्यांनाच निरंतर शास्वत राज्य करण्याचं खरं सूत्र उमजलं..
(सक्षणा सलगार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://files.appsgeyser.com/Namaskar%20Live.apk?dl=true
============================
अयोध्येतील राम मंदिर खुलं करणं ही राजीव गांधींची चूक : राष्ट्रपती
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर खुलं करणं हा राजीव गांधींचा चुकीचा निर्णय होता. तसंच बाबरी मशिद पाडणं हा पूर्ण विश्वासघात होता, ज्यामुळे भारताच्या प्रतिमेला तडा गेला, असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मकथेत व्यक्त केलं आहे. प्रणव मुखर्जी यांच्या ‘द टर्ब्युलेंट इयर्स : 1980..1996’ या पुस्तकाचं उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीत प्रकाशन झालं.
राष्ट्रपतींच्या या पुस्तकात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. राज जन्मभूमी मंदिर 1 फेब्रुवारी 1986 रोजी खुलं करणं हा आणखी एक चुकीचा निर्णय होता, असं या पुस्तकात लिहिलं आहे.
मुखर्जी लिहितात, “बाबरी मशिद पाडणं हे पूर्णत: विश्वासघातकी कृत्य होतं. एका धार्मिक प्रतिकाचं विध्वंस चुकीचा आणि राजकीय हेतूने प्रेरित होता. यामुळे भारत आणि परदेशातील मुस्लिमांच्या भावनांना धक्का पोहोचला. सहिष्णु आणि विविधतेत एकता अशी असलेली भारताची प्रतिमा या घटनेने नष्ट झाली.”
“मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्याने सामाजिक अन्याय कमी झाला. पण 1989 ते 1991 या काळात हिंसा आणि भारतीय समाजातील फूट सर्वाधिक पाहायला मिळाली,” असंही पुस्तकात नमूद केलं आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लिहिलं आहे की, “जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि सीमेपार दहशवाद सुरु झाला. राज जन्मभूमी मंदिर, बाबरी मशिदीच्या मुद्द्यांनी देश हादरला. अखेर 21 मे 1991 रोजी एका आत्मघातकी हल्लेखोरांनी राजीव यांच्या जीवनाचं दु:ख अंत केला.”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
दुसरा सामना आणि मालिकाही जिंका
मेलबर्न : अॅडलेडच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर 37 धावांनी मात केल्याने आत्मविश्वास उंचावलेली टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेण्टी-20 मालिकेतल्या दुसरा सामना आज मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजून आठ मिनिटांनी ही लढाई सुरु होईल. त्यासाठी भारतीय खेळाडू शुक्रवारी नेट्समध्ये घाम गाळताना दिसले.
मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेनेही काही काळ सराव केला. कॅनबेराच्या तिसऱ्या वन डेदरम्यान रहाणेच्या हाताला दुखापत झाली होती. त्यातून तो अजूनही सावरतो आहे.
दरम्यान युवराज सिंग आणि सुरेश रैनाच्या समावेशामुळे अॅडलेडमध्ये भारतीय संघात ताळमेळ दिसून आला होता. त्यामुळं कर्णधार धोनी टीमच्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल करण्याची शक्यता नाही.
हवामान खात्याने मेलबर्नमध्ये शनिवारी पवासाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्ररक्षणच स्वीकारु शकतो.
++++++++++++++++++++++++++++++++++++++
मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर 30-35 फुटांचा मृत मासा
मुंबई : मुंबईतील जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर ब्रुडीज व्हेल जातीचा मासा मृतावस्थेत आढळला. हा मासा साधारणपणे 30 ते 35 फूट लांबीचा असून त्याचं वजन तब्बल 20 टन असल्याचं कळतं.
समुद्राला भरती असल्याने किनाऱ्यावर येत असलेला हा मासा वाळूत रुतून बसला. या माशाला क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात येणार आहे. वनखात्याकडून रात्रभर या ठिकाणची पाहणी सुरु होती.
तसंच या माशाच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. त्याचा मृत्यू कसा झाला आणि तो किनाऱ्यावर कसा आला याचा तपास सुरु आहे.
या आधी सात ते दहा फूट लांबीचे अनेक मासे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या लांबीचा आणि वजनाचा मासा प्रथमच किनाऱ्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++
हेमा मालिनींनवर मेहरबानी, मुंबईतील कोट्यवधीचा भूखंड अवघ्या 70 हजारात
मुंबई: भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना मुंबईतल्या महागड्या भूखंडाची स्वस्तात खैरात करण्यात येणार असल्याची बाब, माहिती अधिकारात उघड झाली आहे.
अंधेरीतील ओशिवरा परिसरातील 2 हजार स्क्वेअर मीटर जागा हेमा मालिनींच्या नाट्य विहार केंद्राला फक्त 70 हजारात देण्यात येणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भातली माहिती मागितली होती. त्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे ही जागा बागेसाठी आरक्षित आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीसाठी 1976च्या दर लावण्यात आला आहे. 35 रुपये प्रती चौरस मीटर एवढा आकारण्यात आला आहे. एकीकडे आरक्षित जागा सुरक्षित ठेवण्यात येईल अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यावर अशा प्रकारे भाजपच्याच खासदारांना स्वस्तात जमीन कशी दिली जाऊ शकते हा प्रश्न उपस्थित होतो आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++
'रँचो' पुन्हा मोठ्या पडद्यावर, लवकरच 'थ्री इडियट्स'चा सिक्वेल
मुंबई: एकेकाळी बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ सिनेमाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. त्यामुळं राजकुमार हिरानी आणि आमीर खान ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.
हीच जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र येत असून थ्री इडियट्स सारख्या सुपर डुपर सिनेमाच्या सिक्वेलच्या तयारीला लागलं आहे. खुद्द आमीर खाननेच ही गोष्ट मीडियासोबत शेअर केली आहे. ‘राजू हिरानीच्या डोक्यात सिक्वेलची थीम तयार असून फायनल स्क्रिप्टची मी वाट पाहातोय.’ असं आमीर खानने सांगितलं.
दंगल सिनेमासाठी आमीरनं बरचं वजनही वाढवलं होतं. मात्र, थ्री इडियट्सच्या सिक्वेलसाठी पुन्हा 25 किलो वजन कमी करावं लागणार असल्याचंही आमीरनं सांगितलं. या सिनेमात आर. माधवन देखील असणार आहे. ‘थ्री इडियट्स’ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम केली होती. त्यामुळं या सिनेमाचा सिक्वेलबाबतही बरीच उत्सुकता दिसून येते आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++
अंदमान दौऱ्यात मुंबई महापौरांचीही हजेरी, दौऱ्यावर 14 लाखांचा खर्च
मुंबई: मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. स्थायी समितीच्या अंदमान दौऱ्यात महापौरांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी महापौरांच्या या दौऱ्याचा निषेध केला आहे. शिवाय महापौरांना प्रोटोकॉल पाळला नसल्याचा आरोपही काँग्रेसनं केला.
आजपासून स्थायीचे सदस्य 1 फेब्रुवारीपर्यंत अंदनामच्या दौऱ्यावर आहेत. प्रत्येक नगरसेवकासाठी 65 हजाराचा खर्च येणार आहे. या दौऱ्यामध्ये महापौरांनी सहभाग घेतल्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीनं आरोप केले आहेत.
स्थायी समितीचा अंदमान दौरा हा तेथील सांडपाण्याची व्यवस्था, मलनि:स्सारण वाहिन्यांची व्यवस्था यांचा अभ्यास करण्यासाठी आखण्यात आला आहे. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी पाच दिवसीय दौरा असणार आहे. प्रत्येक नगरसेवकासाठी ६५ हजार खर्च करण्यात येणार असून दौ-यासाठीचा एकूण अंदाजे १४ लाखांचा खर्च होणार आहे.
=====================================================
एका लॉग इनमधून फक्त 6 तिकीटं, एजंटगिरी रोखण्यासाठी रेल्वेचं पाऊल
मुंबई: रेल्वेचं ऑनलाईन तिकिट बुक करणाऱ्यांसाठी आता रेल्वे मंत्रालयानं तिकीट संदर्भात नवा नियम काढला आहे. आयआरसीटीसी या वेबसाईटवरुन ऑनलाईन तिकिट बुक करताना, एका व्यक्तीच्या लॉग इनवरुन दिवसात दोन आणि एका महिन्यात केवळ 6 तिकिटच घेता येणार आहे.
हा नवा नियम 15 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. तिकिटांची काळाबाजारी रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मात्र, या नव्या नियमाचा सर्वसामान्यांना फटका बसणार आहे.
15 फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे. रेल्वेने मागील काही दिवसांपासून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर होणाऱ्या ऑनलाइन तिकीटाचा काळाबाजार रोखण्यासाठी काही नवी पाऊलं उचलली आहेत.
1. आगाऊ तिकीटं बुकींगसाठी सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत एका यूजर आयडीवरुन केवळ दोन ऑनलाईन तिकीटं बुक करता येणार
2. तत्काळ तिकीटच्या बुकींगसाठी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत एका यूजर आयडीवरुन दोन तिकीटं बुकींग करता येतील.
3. सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत एका लॉगिनहून रिटर्न किंवा ऑनवर्ड जर्नीशिवाय फक्त एक बुकींग करता येणार आहे.
=====================================================
कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्धाचा मृत्यू
शिर्डी : एखादं प्रशासन किती असंवेदनशील असू शकतं याचं मूर्तीमंत उदाहरण नुकतचं शिर्डीमध्ये दिसून आलं आहे. कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. विठ्ठल नारकर असं या वृद्धाचं नाव असून ते मुळचे मुंबईचे रहिवासी असल्याचं कळतं.
एक वयोवृद्ध रुग्ण पिंपळवाडी रोडवर दोन दिवसांपासून असल्याची माहिती आरोग्य विभागाला कळवली. यानंतर विठ्ठल नारकर यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांनी चक्क कचऱ्याच्या गाडीचा वापर केला होता.
खरंतर साईंच्या आशीर्वादाने नगरपंचायत अब्जाधीश झाली. भक्तांच्या कोट्यवधींच्या दानाने साई संस्थानाची भरभराट झाली. मोठमोठाली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरु झाली. शंभरहून अँब्युलन्स आल्या. पैशाची श्रीमंती बक्कळ आली. पण एका रुग्णाला उपचारासाठी नेताना प्रशासनाला एकही रुग्णवाहिका मिळू नये याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्दयी कारभारावर सध्या सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.
शिर्डीत साईंच्या रुग्णसेवेला हरताळ फासण्याचाच हा प्रकार असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
===================================================
मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत
मुंबई : लोकलमार्गावरील अडथळ्यांमुळे मुंबईकरांना आज मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. कारण मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोईसर आणि पालघर दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे डहाणूवरून चर्चगेटकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका गुजरातवरून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस आणि डहाणूवरून सुटणाऱ्या लोकल गाड्यांना बसला आहे.
चर्चगटकडे येणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत.
मध्य रेल्वेही विस्कळीत
दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. आसनगाव-कसारा दरम्यान मालगाडी रेल्वेचं इंजिन बंद पडल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक उशिराने धावत आहे.
तर पळसदरी ते खोपोली दरम्यान रेल्वेचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, कर्जत ते खोपोली आणि मुंबईहून खोपोलीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. मात्र मुंबई-कर्जत वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
=================================================
भाडे नियंत्रण कायद्यावरून शिवसेना - भाजपची खडाजंगी
मुंबई: भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणांवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. मात्र मूळ भाडे नियंत्रक कायद्यात कोणताही बदल करणार नसल्याचं गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. तसा विचारही सरकारनं केला नसल्याचा दावा मेहतांनी केला.
त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रकाश मेहतांवर टीका केली. मेहतांना भाजप आमदार आशिष शेलारांचा गुण लागला आहे, असं म्हणत रामदास कदमांनी मेहतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
“प्रकाश मेहतांनी कायदा दुरुस्ती नाकारावी याचं आश्चर्य वाटतंय. ढवळ्या शेजारी बांधला पवळया, वाण नाही पण गुण लागला तसा मेहतांना आशिष शेलारांचा गुण लागला असावा”, असं टीकास्त्र रामदास कदमांनी सोडलं
मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्यासाठी भाजपनं कायद्यात बदल करण्याचा घाट घातलाय, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून शिवसेना भाडे नियंत्रण कायद्याचं भांडवल करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
============================================
रुग्णांना फसवणार्या सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
वसई– 28 जानेवारी : सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा IBN लोकमतने आज पर्दाफाश केला आहे. वसईच्या आशीर्वाद प्रार्थना केंद्र या ठिकाणी जी शिबीरं सुरूअसतात, त्यामध्ये असाध्य आजार झालेल्या रुग्णांना खडखडीत बरं करण्याचा दावा हा भोंदूबाबा करतो.
या भोंदूबाबाचं नाव सबॅस्टिअन मार्टिन असं आहे. राजरोस आणि खुलेआम सुरू असलेल्या या शिबीरांचे व्हिडीओ यू -ट्यूब आणि इतर सोशल मीडियावरही आहेत. पण पोलिसांना किंवा सरकारला याची कल्पनाच नाही. जादूटोणा विरोधी कायदा असतानाही या सबॅस्टिनवर कारवाई का होत नाही? त्याला अटक का होत नाही? हाच खरा प्रश्न आहे. नेमका हा काय प्रकार आहे, त्याची काही उदाहरणं बघूयात.. मिलिंद जाधव आणि उषा या रुग्णांना या बाबाने कसं बरं केलं ते बघूयात…
======================================================
पूर्वी शनी चौथर्यावर जाऊन महिला दर्शन घेत होत्या, मग आता का नाही ? – विखे पाटील
अहमदनगर – 29 जानेवारी : शनी शिंगणापूरला पूर्वी महिला चौथर्यावर जात असल्याची चर्चा आहे, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे चौथर्यावर महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. ते अहमदनगरला बोलत होते.
विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार धर्मादाय आयुक्तना असून मुख्यमंत्र्यांकडे हे खातं आहे. त्यामुळं त्यांनी चौकशी करणे गरजेचं होतं. मात्र सरकारनं पुढाकार घेण्याऐवजी जिल्हा प्रशासनवर जबाबदारी सोपवली. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त कारवाई करुन निलंबित करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केलीय. विश्वस्त नेमणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. इतकंच नाही तर सर्वच प्रमुख देवस्थानाचं व्यवस्थापन राज्य सरकारनं आपल्या हाती घ्यावं असंही त्यांनी सुचवलंय. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक चौथर्यावर जाऊन दर्शन घ्यावं अशी मागणी भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केली आहे, त्यालाही विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
=================================================
शनी हा देव नव्हेच, तो तर आहे ग्रह; त्याला पळवून लावले पाहिजे - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
शनिशिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याचा वाद शिगेला पोहोचला असताना द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी, शनी हा मुळात देव नव्हे तर तो केवळ एक ग्रह आहे, असे म्हणून या वादात तेल ओतले आहे.
शनी हा देव नसून तो एक ग्रह आहे. तेव्हा त्याची पूजा करण्याऐवजी त्याला पळवून लावले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
महिलांनी शनीच्या चौथऱ्यावर प्रवेशासाठी संघर्ष करण्याची काहीच गरज नाही. कारण पूजा ही देवाची केली जात असते, ग्रहाची नाही आणि शनी हा एक ग्रह आहे. त्यामुळे महिलांनी शनी पूजनापासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे, असे स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले.
शनी शिंगणापूर येथील शनी चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी आहे. ही बंदी उठविण्यात यावी यासाठी पुण्याच्या भूमाता रणरागिणी ब्रिगेड या महिला संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
शंकराचार्यांच्या मते, या देशातील महिलांना यापूर्वीच सर्व सामाजिक अधिकार मिळाले आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष अशी सर्व मोठी पदे त्यांनी भूषविले आहेत. परंतु धर्म मान्यता आणि परंपरांवर चालत असतो. तेथे सामाजिक अधिकारांना स्थान नाही.


No comments:
Post a Comment