पेट्रोल- डिझेलवरील उत्पादन शुल्कात पुन्हा वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली असून या नव्या घोषणेनुसार पेट्रोलच्या दरात ७५ पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या दरात १ रुपया ८३ पैसे प्रति लिटर इतक्या दराने उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क बोर्डाने( सीबीईसी) वितरीत केलेल्या परिपत्रकात अनब्रॅंडेड किंवा सामान्य पेट्रोलवर मूलभूत उत्पादन शुल्क ७ रूपये ३६ वरून वाढवत ते ८ रूपये ११ पैसे प्रति लिटर केले आहे. याचा उद्देश अधिक महसूल गोळा करून वित्तीय तूट जीडीपीच्या ३.९ टक्क्यापर्यंत आणण्याचे लक्ष गाठणे हा असल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
लागोपाठ पेट्रोल-डिझेलवर उत्पादन शुल्क वाढवण्याची सरकारची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी याच महिन्याच्या सुरूवातीला पेट्रोलवर ३७ पैसे प्रति लिटर, तर डिझेलवर २ रूपये प्रति लिटरच्या दराने उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली होती. या वाढीमुळे सरकारला सुमारे ४४०० कोटी रूपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी सरकारने १७ डिसेंबरला पेट्रोलवर ३० पैसे प्रति लिटर आणि डिझेलवर १ रूपये १७ पैसे प्रति लिटरच्या दराने उत्पादन शुल्क वाढवून २५०० कोटी रूपयांच्या उत्पन्नाचे लक्ष ठेवले होते. इंधनावर उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे घटणारी गुंतवणूक आणि प्रत्यक्ष कर गोळा करण्यात येणारी घट काही प्रमाणात रोखता येऊ शकणार आहे.
No comments:
Post a Comment