पुणे – 27 जानेवारी : साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण न छापल्याने संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि साहित्य महामंडळात सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. महामंडाळाने अध्यक्षीय भाषणाच्या एक हजार प्रती छापल्याने सबनीसांनी आपले नियोजित उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
नुकत्याच पार पडलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण न छापल्याने सबनीस नाराज झाले होते. महामंडळावर असहिष्णुतेचा आरोप करीत येत्या 26 जानेवारीपर्यंत भाषणाच्या प्रती छापाव्यात; अन्यथा 27 जानेवारीपासून महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर सपत्नीक उपोषण करण्याचा इशारा सबनीस यांनी महामंडळाला दिला होता. त्यावर महामंडळाने नमते घेत सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या एक हजार प्रती छापल्या. त्यातील 25 प्रती मंगळवारी त्यांच्या पुण्यातील घरी पाठविल्या. त्यानंतर सबनीस यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर करत महामंडळाचे आभार मानले आहेत.

No comments:
Post a Comment