Monday, 11 January 2016

सत्‍तर वर्षाचा खय्यूम पहेलवान माळेगावच्‍या आखाडयात



श्रीक्षेत्र माळेगावमिडीया सेंटर, 11- आखाडयात पहेलवानकी गाजविणा-या युवकांची संख्‍या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. मात्र माळेगाव यात्रेत हिंगोली जिल्‍हयातल्‍या आखाडा बाळापूर येथील खय्यूम नावाचे सत्‍तर वर्षाचे पहेलवान आखाडयात उतरले. त्‍यांची पांढरी दाढी पाहून अनेकांना हसू आले. पण वयातही खय्यूम पहिलवानकीचा नियमित सराव करुन कुस्‍त्‍यांच्‍या आखाडयातील त्‍यांचा उत्‍साहन आजही तसाच पहायला मिळतो. महाराष्‍ट्र आणि आंध्रप्रदेशातील विविध यात्रेतून दरवर्षी सुमारे शंभर ते सव्‍वाशे कुस्‍त्‍यांच्‍या आखाडयात ते उतरतात.
     कुस्‍ती कितीवेळा जिंकली असा प्रश्‍न विचारला असता ते म्‍हणाले मागच्‍या वर्षात एकशे बत्‍तीस कुस्‍त्‍यांपैकी एकशे पंधरा कुस्‍त्‍या त्‍यांनी जिंकल्‍या आहेत. 1975 पासून ते कुस्‍ती खेळतात. या पस्‍तीत ते चाळीस वर्षात त्‍यांनी अनेक उन्‍हाळे आणि पावसाळे पाहिले आहेत. माळेगाव यात्रेत बाविस वर्षाच्‍या युवकांसोबत सहाशे रुपयांची लावलेली कुस्‍ती त्‍यांनी जिंकली.
पश्‍चिम महाराष्‍ट्रातील मल्‍लांनी कुस्‍तीची परंपरा जोपासली असून मराठवाडयातही ही परंपरा कायम राहीली पाहिजे असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. वर्षातून दोन ते तीन महिने खय्यूम पहिलवान कोल्‍हापूरच्‍या मोती बागेत सरावासाठी जात असतात. तेथील राजू चोकले हे त्‍यांचे गुरु आहेत. त्‍यांच्‍याकडून कुस्‍त्‍यांचे अनेक डावपेच त्‍यांनी शिकले आहे.
जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्‍याही वयात माणूस कुस्‍त्‍यांच्‍या मैदानात उतरु शकतो. फक्‍त दारु, बिडी, तंबाखू सारखे व्‍यसन पहिलवानांनी करु नये. काजू, बदाम खाल्‍यावरच बळ येते असे नाही तर दररोज सकाळ व संध्‍याकाळी एक-एक लिटर दूध आणि साधा आहार, तसेच नियमित साधा आहार मल्‍लही कुस्‍त्‍यांच्‍या आखाडयात बाजी मारु शकतात, असा विश्‍वास खय्यूम पहेलवान यांनी व्‍यक्‍त केला. 

No comments: