नवी दिली : भारत आज 67 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. भारतमातेसाठी लढता लढता शहीद झालेल्या शूरवीरांना आज मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. अशातीलच एक म्हणजे शहीद मोहन नाथ गोस्वामी.
देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अर्थात ‘अशोक चक्र’ने लान्स नाईक मोहन नाथ गोस्वामी यांचा मरणोत्तर सन्मान झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते शहीद मोहन नाथ यांच्या पत्नीने पुरस्कार स्वीकारला.
शहीद लान्स नाईक मोहन नाथ गोस्वामी हे लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचे कमांडो होते. पॅराशूट रेजिमेंटचे कमांडो हे शत्रूच्या भागात कोणताही पुरावा न सोडता ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामधील हंदवाड्याच्या जंगलात भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं होतं. दोन्ही बाजूने जोरात गोळीबार सुरु होता. यादरम्यान, दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याच चकमकीदरम्यान मोहन नाथ यांनी सहकारी जखमी जवानांना सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही. आणि यावेळीची दहशतवाद्यांशी लढताना मोहन नाथ यांना मांडी आणि पाठीवर गोळी लागली आणि ते शहीद झाले.
शहीद मोहन नाथ गोस्वामी यांचं कुटुंब उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये राहतं. त्यांच्या पश्चात त्यांची आई, भाऊ, पत्नी आणि सात वर्षांची मुलगी आहे.
दहशतवाद्यांपासून देशाचं संरक्षण करताना मोहन नाथ शहीद झाले आणि त्यांच्या रुपाने भारतमातेनं आपला एक शूरवीर गमावला. मोहन नाथ यांच्यासारख्या शूरवीराला हा देश कधीही विसरणार नाही.

No comments:
Post a Comment