Thursday, 28 January 2016

नमस्कार लाईव्ह २८-०१-२०१६ सकाळचे सविस्तर बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २८-०१-२०१६चे बातमीपत्र 

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय] 
१- बाँबस्फोटात ३२९ जणांचा बळी घेणा-या इंदरजीत सिंगची कॅनडात मुक्तता 
२- अॅपलच्या विक्रीत मोठी घट, चीन सोडून आता भारताकडं लक्ष 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- छगन भुजबळांच्या एमईटी संस्थेला हायकोर्टाचा दणका 
४- जकात, अबकारी शुल्क विभागाशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी; मोदींचा तीव्र संताप व्यक्त 
५- मोदी हे श्रीराम, मोदीलाटेमुळेच निवडून आलो : परेश रावल 
६- पासपोर्ट आता मिळणार फक्त आठ दिवसांतच ! 
७- काही हिंदू समूहांकडून मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन - जावेद अख्तर 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- मुंबईच्या कुशीत आयसिसचं ट्रेनिंग सेंटर  
९- पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा राजपथावरील लष्करी सामर्थ्य कुठे लुप्त होते?- शिवसेना 
१०- मुंबईच्या डबेवाल्याला वेग, बाईकवरुन एकावेळी 50 डबे 
११- ड्रिंक अॅण्ड्र ड्राईव्ह : रिक्षाचालकाला एक महिन्याचा तुरुंगवास  
१२- शनिशिंगणापूरमागोमाग आता महिलांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदीरातही दर्शनासाठी प्रवेश मिळण्याची मागणी केली 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या सुरुंग स्फोटात सात पोलिस शहीद 
१४- अहमदाबाद; भर बाजारात तरुणावर तलवारीने हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद 
१५- ठाणे; वाघाची विषारी ‘शिकार’ करणारी टोळी जेरबंद 
१६- नागपूर; आता कैद्यांसाठीही एटीएम  
१७- औरंगाबाद; आता होणार ‘चाय पे शादी’ 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या करदात्यांमध्ये सलमान आणि शाहरूख खान आघाडीवर 
१९- विद्या बालनचं मराठी पदार्पण, 'एक अलबेला'चा फर्स्ट लूक 
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- आयुक्तांच्या वाहनाची चुकीची नंबर प्लेट; पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून परिवहन अधिकाऱ्याची नोटीस 
२१- महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सिंधुताई काकडे, उपसभापतीपदी ललिता शिंदे 
२२- बिलोली; कसराळी येथील ग्रामसेवकास दीड हजाराची लाच घेतांना अटक 
२३- स्वार्थ, जातपातीच्या राजकारणामुळे संवादाचा अभाव - डॉ. श्रीपाल सबनीस 
२४- किनवट; सिंदगी [खु] येथील शेतकऱ्याची नापिकीला कंटाळून आत्महत्या 
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अविनाश सूर्यवंशी, हरी सिंघ, केशव कऱ्हाळे, परमजीत सिंघ 
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय ठेवून समाजात वावरू लागते तेंव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात
(भक्ती पोहरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://files.appsgeyser.com/Namaskar%20Live.apk?dl=true


मुंबईच्या डबेवाल्याला वेग, बाईकवरुन एकावेळी 50 डबे 

नवी मुंबई : चाकरमान्यांना वेळेवर आणि खात्रीशीर डबे पोहचवण्याचे काम करणारे मराठी डबेवाले आता वेगवान झाले आहेत. नवी मुंबईच्या भैरवनाथ पतपेढीतर्फे कर्ज उपलब्ध झाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांनी 60 मोपेडची खरेदी केली आहे. या व्यवसायात परप्रातियांकडून निर्माण झालेलं आव्हान पेलण्यासाठी मराठी डबेवाल्यांनी अपटूडेट राहण्यासाठी पावलं उचलली आहेत. सध्या हे डबेवाले हातगाडी आणि सायकलचा वापर करुन घरचे जेवण चाकरमान्यांना वेळेत पोहचवतात. जेवणाचे डबे अधिक वेगाने आणि जास्त संख्येने देता यावेत यासाठी हे डबेवाले आता दुचाकीवर स्वार झाले आहेत. त्यासाठी टीव्हीएसने खास मोपेड तयार केली असून त्यावरुन एकाचवेळी 50 डबे नेता येणार आहेत. याशिवाय आता हे डबेवाले ऑनलाईन शॉपिंग कंपनीच्या वस्तू पोहोचवण्याची जबाबदारी जोडधंदा म्हणून उचलणार आहेत. 

-----------------------------------------------------------------------
मोदी हे श्रीराम, मोदीलाटेमुळेच निवडून आलो : परेश रावल 

अहमदाबाद : सुप्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळताना त्यांची
तुलना थेट प्रभू रामचंद्रांशी केली आहे. ज्याप्रकारे प्रभूरामांच्या नावाचे दगड पाण्यावर तरंगले होते, त्याप्रमाणे मोदी लाटेत आम्ही निवडून आलो, असं रावल म्हणाले. परेश रावल हे अहमदाबाद पूर्वच्या जागेवरुन भाजप खासदार आहेत. ‘माझ्या जागी इतर कोणीही 2014 मधील लोकसभा निवडणुकीत उभं असतं तर तोही निवडून आला असता’ असं धक्कादायक विधान परेश रावल यांनी केलं आहे. अहमदाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रावल यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं वाद होण्याची शक्यता आहे. चित्रपट पुरस्कार हे लॉबिंग केल्यावरच मिळतात, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. बॉडीगार्ड घेऊन ऑडी कारमधून फिरणाऱ्यांना कसली आलीये असहिष्णुता, असा सवालही त्यांनी विचारला.

-----------------------------------------------------------------------
अहमदाबाद; भर बाजारात तरुणावर तलवारीने हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद

अहमदाबाद : गुजरातच्या भावनगरमधील बाजारात अज्ञातांनी एका तरुणावर काठ्या, तलावारीने हल्ला केला. या हल्ल्यात 22 वर्षीय हितेश दामाभाई राठोड नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. भर बाजारात झालेल्या या घटनेने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी झाले. मेईन बाजारात दुपारी रिक्षा पार्क करण्याचा वाद एवढा वाढला की काही जणांनी काठ्या, तलवारीने हितेश राठोडवर हल्ला केला. भाजी मार्केटमध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पाचही हल्लेखोर तिथून पसार झाले. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि गंभीर जखमी झालेल्या तरुणाला भावनगर रुग्णालयात दाखल केलं. भाजी मार्केटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ल्याचा थरारा कैद झाला आहे. याच सीसीटीवी फुटेजच्या आधारावर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

-----------------------------------------------------------------------
विद्या बालनचं मराठी पदार्पण, 'एक अलबेला'चा फर्स्ट लूक

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचं मराठीतील पदार्पण असलेल्या ‘एक अलबेला’ चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाला आहे. अभिनेता भगवान दादांच्या जीवनावर आधारित या मराठी चित्रपटात विद्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता फर्स्ट लूकनंतर आणखी ताणली जाणार आहे. अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटात भगवानदादांची भूमिका करणार आहे. तर गीता दत्तच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे. शेखर सरतांडेल हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. खेळ मांडला या चित्रपटातील मंगेश देसाईची भूमिका विशेष गाजली होती. त्याशिवाय बायोस्कोपमध्ये त्याने रंगवलेला शेतकरी, मास्तर एके मास्तर, ब्लाईंड गेम, हुप्पा हुय्या चित्रपटातील भूमिकांचंही कौतुक झालं होतं. ‘उलाला गर्ल’ अभिनेत्री विद्या बालनने पा, इश्किया, द डर्टी पिक्चर यासारख्या अनेक चित्रपटातून केलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. एक अलबेलामध्ये तिच्या स्पेशल अपिअरन्समुळे चित्रपटाला वेगळंच ग्लॅमर मिळालं आहे.

-----------------------------------------------------------------------
छगन भुजबळांच्या एमईटी संस्थेला हायकोर्टाचा दणका

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मुंबई हायकोर्टानं दणका दिला आहे. भुजबळांच्या एमईटी शिक्षण संस्थेकडे दत्तक तत्त्वावर ताब्यात असलेलं जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान महापालिकेला परत करणं एमईटीला भाग पडणार आहे. खासगी संस्थांनी उद्याने दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यास महापालिकेनं संमती दिली होती. भाडेपट्ट्याची मुदत संपल्यावर मात्र ती बाग जिथे आहे, जशी आहे त्या तत्त्वावर परत करण्याची नोटीस महापालिकेने एमईटीला बजावली होती. महापालिकेविरोधात एमईटीने कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र महापालिकेच्या उद्यान धोरणात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे एमईटीला उद्यान महापालिकेला परत करावं लागणार आहे. दत्तकतत्त्वार दिलेली उद्यानं आणि मैदानं परत ताब्यात घ्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिकेला सांगितले. त्यानुसार पालिकेने गेल्या आठवड्यात 36 जणांना नोटीस बजावून उद्यान तसेच मैदानाचा ताबा परत मागितला आहे. यामध्ये एमएईटीला दिलेले वैद्य उद्यान व नागपाडा येथील एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या उद्यानाचाही समावेश आहे.

-----------------------------------------------------------------------
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या सुरुंग स्फोटात सात पोलिस शहीद

रांची : झारखंडच्या छत्तरपूर भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या सुरुंग स्फोटात सात पोलिस शहीद झाले आहेत. पलामू जिल्ह्याच्या कालापहाडी परिसरात नक्षलवाद्यांनी बुधवारी संध्याकाठी आयईडी स्फोट घडवले. या हल्ल्यात सहा पोलिस जखमी झाल्याचंही कळतं. जखमी पोलिसांनी हेलिकॉप्टरमधून रांचीमधील रुग्णालयात हलवण्यात येत आहे. सध्या काही जणांवर पलामूमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते एस एन प्रधान यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांनी मोहुआदंड-जापला रोडवर लँडमाईन स्फोट करुन पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनला लक्ष्य बनवलं. या व्हॅनमध्ये 13 पोलिस होते. त्यापैकी सात पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी आहेत. 

-----------------------------------------------------------------------
मुंबईच्या कुशीत आयसिसचं ट्रेनिंग सेंटर 

मुंबई: इराक आणि सीरियामध्ये बसून जगभरात नरसंहार घडवणाऱ्या आयसिसनं आता भारताकडे मोर्चा वळवला आहे. भारतात चक्क ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी आयसिसनं हालचाली सुरू केल्या आहेत. ट्रेनिंग सेंटरसाठी आयसिसनं देशातली कोणती जागा निव़डलीय?, भारतात आयसिसची पाळमुळं कुठवर जाऊन पोहचली आहेत? आपला नापाक मनसुबा तडीस नेण्यासाठी आयसिसनं कोणता कट आखला आहे. या सर्व प्रश्नांचा खुलासा करणार आहे ‘माझा’चा हा स्पेशल रिपोर्ट…. देशभरात आयसिसच्या संशयित अतिरेक्यांचं धाडसत्र सुरु झालं. 20 जण जाळ्यात आले. चौकशी सुरु झाली आणि समोर आले अनेक धक्कादायक मनसुबे. आयसिस भारतात आपली पाळंमुळं मजबूत करत असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. काय आहे त्यांचा प्लॅन? तो प्लॅन अंमलात आण्यासाठी कशी सुरु आहे तयारी? हेच जाणून घेण्यासाठी आम्ही पोहोचलो मुंबईपासून अवघ्या 45 किलोमीटर दूर असलेल्या पनवेलमध्ये. मुंबईचं प्रवेशद्वार असलेलं पनवेल हे शहर याआधी कधीही अतिरेक्यांशी जोडलं गेलं नव्हतं. इथं कधीही अतिरेकी कारवायांमुळे तणाव नव्हता. ना या शहराला कधी जातीय तणावाचा डाग लागला होता. पण याच शहराच्या शेजारी असलेल्या या जंगलात काही तरी घडत होतं. जे भयंकर होतं. घनदाट जंगल, डोंगररांगा आणि कर्नाळ्याचं पक्षी अभयारण्य. हा भाग अत्यंत निर्मनुष्य असाच, आणि म्हणूनच आयसिसनं आपल्या ट्रेनिंग कॅम्पसाठी याच भागाची निवड केली. धक्कादायक म्हणजे उत्तरप्रदेशात अटक झालेला संशयित अतिरेकी रिझवान अहमद या जागेची रेकी करण्यासाठी आला होता. 20 वर्षांचा रिझवान उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिझवानच्या या रेकीची माहिती अटकेतल्या संशयितांनी तपास यंत्रणांना दिली आहे. फक्त रिझवानच नाही, तर इतर सर्वजण या जागेची पाहाणी करण्यासाठी जाणार होते. याचाच अर्थ ही जागा बनणार होती आयसिसचं देशातलं पहिलं ट्रेनिंग सेंटर. रिझवाननं पाहाणी केली होती. प्रतीक्षा होती इतरांनी जागा पाहण्याची. त्यात मुंब्र्यातून पकडला गेलेला मुदब्बीर शेख, औरंगाबादेतून पकडलेला इमरान पठाण यांचाही समावेश होता. या अतिरेक्यांना इथं बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घ्यायचं होतं आणि त्यासाठीच हवी होती अशी निर्मनुष्य जागा. अतिरेकी कारवायांसाठी मुंबईच्या आसपास जागा निश्चित करण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही अतिरेक्यांनी मुंबईच्या आसपास आसरा घेतला होता. आयएसआयएसला भारतामध्ये मोठ्याप्रमाणात घातपात करायचा होता. त्यासाठीच एका गुप्त जागेची गरज होती आणि त्यासाठीच या जागेची निवड झाली होती. धक्कादायक गोष्ट ही, की सगळी तयारी कुंभमेळ्याला निशाणा करण्यासाठी होती. एटीएसनं ज्या मुदब्बीर शेखला मुंब्र्यातून अटक केली त्याच्या घरातून अनेक मोबाईल आणि बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. 40 वर्षांचा मुदब्बीर हा अटकेतल्या 20 जणांचा म्होरक्या होता. पण, या आयटी प्रोफेश्नलचाही म्होरक्या सीरियात बसला आहे. ज्याचं नाव आहे शफी अरमार. भारतात आयसिसचं नेटवर्क पसरवण्यात या शफी अरमारचा मोठा हात आहे. शफीनंच भारतातल्या या 20 जणांचं नेटवर्क तयार केलं. ज्याचं नाव होतं जुंदल खलिफा! भारतात इंडियन मुजाहिद्दीननंतर आता नव्या संघटनेचा उदय झाला. ही संघटना आयसिससाठी काम करते. हे सारे 20 जण शफी अरमारशी थेट संपर्कात होते. इतकंच नाही, तर उत्तरप्रदेशच्या रिझवानला नायब-ए-हिंद असा किताब दिला गेला. आणि बाकीच्या 18 जणांना नायब-ए-मलियत. म्हणजेच खजिनदार आणि नायब-ए-राब्ता बनवण्यात आलं. याचाच अर्थ आयसिसनं जुंदल खलिफाच्या माध्यमातून एक मोठी संघटना उभारण्याचं काम सुरु केलं होतं. कधीकाळी जुंदल खलिफा ही संघटना अल कायदासाठी कार्यरत होती. पण आता ही संघटना आयसिसच्या पंखाखाली आली आहे. या संघटनेचे मनसुबे किती घातक होते आणि भारतात घातपात करण्याचा डाव वर्षभरापासून आखला जात होता. लखनौच्या मायावतीनगरमध्येच या संघटनेची पहिली मीटिंग झाली होती. याचाच अर्थ फक्त एका वर्षाच्या आत आयसिसनं भारतात पाऊल टाकलं आणि पायाही भक्कम केला. जुंदल खलिफा या संघटनेला हवाल्याद्वारे पैसा मिळायचा. चौकशीत एकूण रक्कमेची माहिती समोर यायची आहे. पण आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त फंड संघटनेला मिळाल्याचं समोर आलं. यातले काही पैसे औरंगाबादेतून अटक झालेल्या इमरान पठाणलाही मिळाले होते. तेही मुंबईच्या जवळच त्याला देण्यात आले होते. औरंगाबादेत कॉम्प्युटर हार्डवेअरचा कोर्स करणारा इमरान मुंबईतही राहिलेला आहे. आयसिसचा प्रचार करण्याची जबाबदारी इमरानवरच होती. इतकंच नाही, तर माझगावमधून पकडला गेलेला साथिदार हुसैन खान याच्याकडेच हवाल्याचे पैसे येत असल्याचा आरोप आहे.  या सगळ्यांच्या अटकेमुळे भारतात होऊ घातलेल्या आयसिसच्या एका बड्या प्लॅनला उधळून लावण्यात यश आलं आहे, मात्र मुंबई शहराच्या कुशीत आयसिसच्या एका ट्रेनिंग सेंटरची तयारी मात्र आपल्या सगळ्यांच्या चिंतेत भर घालणारी आहे.

-----------------------------------------------------------------------
अॅपलच्या विक्रीत मोठी घट, चीन सोडून आता भारताकडं लक्ष 

मुंबई: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी स्मार्टफोन कंपनी अॅपलच्या विक्रीमध्ये पहिल्यांदाच घट झाली आहे. 13 वर्षामध्ये पहिल्यांदाच अॅपलच्या व्यवसायात घट झाली आहे. आजवरची कंपनीची ही सर्वात वाईट अवस्था असल्याचं कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी मान्य केलं आहे. कंपनी तज्ज्ञांच्या मते, चीनी बाजारात मंदी असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे इतर तज्ज्ञांच्या मते, सलग होणाऱ्या प्रगतीनंतर अॅपल आता या परिस्थितीतून जात आहे. यावर्षी कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची घट झाली आहे. टीम कूकच्या मते, ‘मागील वर्षापेक्षा मागील तीन महिन्यात आयफोनच्या विक्री मोठी घट दिसून आली आहे.’ चीनी बाजारातील मंदी पाहता कंपनीने आता आपलं लक्ष भारताकडं वळवलं आहे. भारतीय बाजारपेठेमुळं कंपनीला मोठा आधार मिळेल अशी आशा टीम कूक यांनी व्यक्त केली आहे. ‘प्रत्येक ब्रॅण्डसाठी बाजारपेठेतील डेमोग्राफिक्स देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळं येत्या काही दिवसात आम्ही भारतात अधिक ताकद लावू.’ असंही कूक म्हणाले.

-----------------------------------------------------------------------
ड्रिंक अॅण्ड्र ड्राईव्ह : रिक्षाचालकाला एक महिन्याचा तुरुंगवास 

मुंबई : दारु पिऊन गाडी चालवणं आणि कायद्याला न जुमानणं, किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय मुंबईतील एका रिक्षाचालकाला आला. बोरीवली कोर्टाने रिक्षाचालकाला एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मालाड ट्रॅफिक डिव्हिजनने मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्या एका रिक्षाचालकाला 20 डिसेंबर 2015 रोजी पकडलं होतं. त्या रिक्षाचालकाला बोरीवली कोर्टाने एक महिना जेलची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय गुप्ता हा मालाड भागात रिक्षा चालवतो. कांदिवली वाहतूक पोलिसांनी 20 डिसेंबर 2015 रोजी दारु पिऊन रिक्षा चालवणाऱ्या विजय गुप्ताला अटक केली होती. त्यावेळी बोरीवली कोर्टानेच त्याला अडीच हजार रुपयांचा दंड आणि एक दिवसाचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली होती. परंतु तरीही विजय गुप्ता सुधारला नाही. कायद्याला न जुमानता विजय गुप्ताने पुन्हा मद्य पिऊन गाडी चालवली. त्यामुळे बोरीवली कोर्टाने विजय गुप्ताला एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. बोरीवली कोर्टाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केलं जात आहे. जर एखादा टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक मद्य पिऊन गाडी चालवताना आढळला तर 100 नंबरवर किंवा 8454999999 या नंबरवर फोन करुन तात्काळ तक्रार करावी, असं आवाहन मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

-----------------------------------------------------------------------
पासपोर्ट आता मिळणार फक्त आठ दिवसांतच !

परदेशात जायचंय म्हणजे पासपोर्ट हवाच. पण हाच पासपोर्स मिळवण्यासाठी आधी लांबलचक रांगेत उभं राहायला लागायचं. पण, आता फक्त आठदिवसांमध्येच पासपोर्ट तुमच्या हाती मिळणार आहे. वेगवेगळ्या कागदपत्रांची पुर्तता आणि पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी कित्येकदा चकरा माराव्या लागत होत्या. पण, आता पासपोर्ट काढणं सोपं होणार आहे. परराष्ट्र खात्यानं याविषयी एक महत्तवपू्र्‌ण निर्णय घेतलाय. नव्या प्रक्रियेनुसार आठवड्याभरात पासपोर्ट मिळणार असून यासाठी फक्त चार कागदपत्रांच्या आधारे प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि ऍनेक्सर I फॉर्मवर प्रतिज्ञापत्र यांचा समावेश आहे. पासपोर्टसाठीच्या मुलाखतींसाठीही कमी वेळ लागणार आहे. तसंच यासाठीचं मुल्यही माफक असेल.

-----------------------------------------------------------------------
ठाणे; वाघाची विषारी ‘शिकार’ करणारी टोळी जेरबंद

वाघाला विष देऊन त्यांची शिकार करून कातडे विकणार्‍या एका चार जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या कल्याण युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 लाखाचे बिबट्याचे कातडे, 70 हजार रुपये किंमतीची वाघनखे आणि मोबाईल असा एकूण 7 लाख 73 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने या आधी सुद्धा अशाच पद्धतीने वाघाची शिकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याचा ही शोध आता गुन्हे शाखा घेतेय. या टोळीत संदीप शिंगरे, महादेव वरघडे, देहू हमभर, आणि आकाश फगे यांचा समावेश आहे. हे सगळे रायगड जिल्ह्यातील पाली तालुक्याचे रहिवासी आहेत. त्यांनी याआधी देखील असे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चौघांवर वन्य जीव सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------
नागपूर; आता कैद्यांसाठीही एटीएम 

जेलमधील कैद्यांना महिन्याकाठी मिळणारी मजुरी आणि नातेवाईंकांनी जमा केलेले पैसे काढण्यासाठी एटीएम देण्याची योजना नागपूर जेलपासून सुरू करण्यात आली आहे. एसबीआय बँकेनं यासाठी पुढाकार घेतलाय. महिन्याला 2000 रुपये खर्च करण्याची मर्यादा आता 2500 रुपये करण्यात आली आहे. या पैशातून कैदी जेलमध्ये साबणापासून – बीडीपर्यंत जेलसर्कुलरनुसार वस्तु विकत घेऊ शकतो. जेलमधील कैद्यांनी जर वर्षभर योग अभ्यास केला तर त्याला 3 महिने शिक्षा माफ होऊ शकते अशीही नवी सवलत आता लागू झाली आहे.

-----------------------------------------------------------------------
पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा राजपथावरील लष्करी सामर्थ्य कुठे लुप्त होते?- शिवसेना 

देशात पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा हे लष्करी सामर्थ्य कुठे लुप्त होते, असा सवाल विचारत शिवसेनेने गुरूवारी केंद्राच्या पाकिस्तानसंदर्भातील भूमिकेवर टीका केली. फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांच्या उपस्थितीत देशाचा ६७ वा प्रजासत्ताकदिन पार पडला. राजपथावर जो नेत्रदीपक वगैरे सोहळा पार पडला त्यात आपल्या लष्करी सामर्थ्याचे भव्यदिव्य प्रदर्शन झाले. हिंदुस्थानचे लष्करी सामर्थ्य किती अफाट आहे ते या निमित्ताने दिसले. हे एकप्रकारे राष्ट्राचेच सामर्थ्य असते. पण हे सामर्थ्य पठाणकोटसारखे हल्ले होतात तेव्हा कुठे लुप्त होते? असा सवाल सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. पॅरिसवर हल्ले होताच ओलांद यांनी गर्जना केली ती फ्रान्सच्या दुश्मनांच्या मनात धडकी भरवणारी होती. ‘वेळ येताच योग्य ठिकाणी धडा शिकवू’ असे त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांप्रमाणे सांगितले नाही, असेदेखील या अग्रलेखात म्हटले आहे. फ्रान्सने स्वदेशातील दुश्मनांचे अड्डे पॅरिस हल्ल्यानंतर खणून काढलेच, कोणतीही दयामाया दाखवली नाही. बाजूच्या बेल्जियम, नेदरलॅण्डसारख्या राष्ट्रांत घुसूनही फ्रान्स सैन्याने कारवाई केली व त्यापैकी अनेक दुश्मनांना यमसदनी पाठवून पॅरिस हल्ल्याचा बदला घेतला. पठाणकोट हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला पुरावे हवे आहेत. ते पुरावे तपासायला पाकिस्तानचे एक चौकशी पथक पठाणकोट येथे पोहोचणार आहे व त्यानंतर कसे काय ते ठरेल. म्हणजे तूर्त तरी सगळेच हवेतील इमले आहेत, असे सांगत सेनेने केंद्राच्या पाकिस्तानसंदर्भातील भूमिकेवरही निशाणा साधला आहे. 

-----------------------------------------------------------------------
देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या करदात्यांमध्ये सलमान आणि शाहरूख खान आघाडीवर 

देशात सर्वाधिक कर भरणाऱ्या करदात्यांच्या यादीवर यंदाही बॉलीवूड कलाकार, शेअर ट्रेडर्स आणि प्रतिष्ठित वकिलांचे वर्चस्व पहायला मिळाले. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राच्या हाती लागलेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खान आणि शाहरूख खान हे दोघेजण बॉलीवूडमधील सर्वाधिक कर भरणाऱ्या व्यक्तींच्या यादीत आघाडीवर आहेत. सलमान खानने येत्या आर्थिक वर्षासाठी आगाऊ कर म्हणून २० कोटी इतकी रक्कम भरली आहे, तर त्यापाठोपाठ अक्षय कुमारने १६ कोटींचा कर भरला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांनी अनुक्रमे ६०० कोटी आणि २०० कोटींचा व्यवसाय केला होता. दरम्यान, या दोघांच्यापाठोपाठ रणबीर कपूरने १५ कोटी आणि शाहरूख खान १४ कोटी आणि अमिताभ बच्चन यांनी ८.७५ कोटींचा कर भरला आहे. याशिवाय, मुंबईतून सर्वाधिक कर भरण्याचा मान गर्भनिरोधक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या फॅमी केअर लिमिटेडच्या टापरिया कुटुंबियातील चौघांनी मिळवला आहे. टापरिया कुटुंबियांनी भरलेल्या आगाऊ कराची एकत्रित रक्कम २११ कोटी इतकी आहे. यामध्ये फॅमी केअरचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आशुतोष टापरिया यांनी ७५ कोटी, व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार टापरिया यांनी ६३ कोटी, अरूणा देवी टापरिया यांनी ३७ कोटी आणि अंजली आशुतोष टापरिया यांनी ३६ कोटी रूपये आगाऊ करापोटी भरली आहेत. आयकर खात्याच्या नियमावलीनुसार नॉन-कॉर्पोरेट प्रकारात मोडणाऱ्या करदात्यांनी त्यांच्या उत्त्पन्नानुसार पहिल्या दोन तिमाहींमध्ये प्रत्येकी ३० टक्के आणि उर्वरित तिमाहींमध्ये ४० टक्के कराची रक्कम भरणे आवश्यक असते. 

-----------------------------------------------------------------------
बाँबस्फोटात ३२९ जणांचा बळी घेणा-या इंदरजीत सिंगची कॅनडात मुक्तता 

१९८५च्या एअर इंडिया बाँबस्फोट प्रकरणात दोषी आढळलेला एकमेव आरोपी इंदरजीत सिंग रेयात २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा बोगून झाल्यामुळे कॅनडाच्या तुरुंगातून मुक्त करण्यात आला आहे. 
कॅनडाच्या सरकारी अधिका-यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एअरलाइनवर सर्वात भीषण हल्ला केल्याप्रकरणी तसेच सुटकेसमध्ये बाँब भरून ते व्हॅन्कोवरमधून सुटणा-या विमानात ठेवल्याप्रकरणी इंदरजीतला ९ व १५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा जाली होती. कॅनडाच्या कायद्याप्रमाणे त्यापैकी अत्यावश्यक शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. एअर इंडियाचे एक विमान आयर्लंडजवळ पोचताना बाँबच्या स्फोटामुळे उध्वस्त झाले ज्यामध्ये विमानातले ३२९ प्रवासी जागीच ठार झाले. तर दुसरे विमान जपानमध्ये बाँबस्फोटात उडाले, ज्यामध्ये माल वाहून नेणारे दोन हमाल ठार झाले. खलिस्तानवाद्यांविरोधात भारताने केलेल्या कारवाईविरोधात बदला म्हणून हे हल्ले करण्यात आले होते. 
इंदरजीतची पूर्ण शिक्षा ऑगस्ट २०१८मध्ये संपणार आहे, तोपर्यंत अनेक अटींसह त्याला तुरुंगात नाही, घरातच परंतु नजरकैदेत रहावे लागणार आहे.

-----------------------------------------------------------------------
काही हिंदू समूहांकडून मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन - जावेद अख्तर 

काही हिंदू समूह आता मुस्लिम कट्टरवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. ही काही तत्त्वे वगळली तर भारतीय समाज कायम सहिष्णु राहिला आहे असे मत सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले    देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात काही साहित्यिक व कलावंतांनी विरोधाचे हत्यार उपसले असताना अख्तर यांनी मुद्यावर थेट बोलणे टाळले. ते कोलकाता येथे एका साहित्य सोहळ्यात बोलत होते.
१९७५ मध्ये मी माझ्या एका चित्रपटात मंदिरातील विनोद दृश्य दाखवले होते. त्या काळात मशिदीत मी असे दृश्य दाखवू शकलो नसतो. कारण तिथे असहिष्णुता होती. आत्ताचे विचाराल तर आता मी मंदिरातही विनोदी दृश्य दाखवणार नाही. याचे कारण म्हणजे आता पहिला पक्ष दुसऱ्या पक्षासारखा वागू लागला आहे. हिंदू नाही तर काही हिंदू समूह आज घडीला मुस्लिम कट्टरवाद्यांसारखे वर्तन करीत आहे. हे क्लेषकारक आहे. 
समाजातील असहिष्णुता धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याचे काही लोक मानत आहेत. मला यावर विश्वास नाही. देशात कुठलीही असहिष्णुता नाही, असेही काही जणांचे मत आहे. मला यावरही विश्वास नाही. खरे सांगायचे तर सध्या देशात या दोघांमधली स्थिती आहे. असेही ते म्हणाले.

-----------------------------------------------------------------------
औरंगाबाद; आता होणार ‘चाय पे शादी’ 

रीब मुस्लीम कुटुंबातील वधुपित्यांना मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादेत मंगळवारपासून ‘चाय पे शादी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यानुसार येत्या १५ दिवसांत पहिली ‘चाय पे शादी’ होणार आहे. मुस्लीम समाजात अनेक गरीब कुटुंबे मुलीच्या लग्नासाठी काढलेली मोठी कर्जे आयुष्यभर फेडत बसतात, असे चित्र दिसते. हे ध्यानी घेऊनच हारून मुकाती इस्लामिक सेंटरने मुस्लीम समाजातील गरिबांसाठी ‘चाय पे शादी’ उपक्रम सुरू केला आहे. याची माहिती देताना सेंटरचे संचालक युसूफ मुकाती यांनी सांगितले की, मुस्लीम समाजात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वधुपिता गरीब असला तरी मुलीच्या लग्नाला एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतोच. यात जेवण, हॉल भाड्याचा खर्च जास्त असतो. लग्नासाठी वधुपिता ८ टक्के व्याजदराने खासगी कर्ज घेतो व आयुष्यभर त्याचा भार त्याच्या डोक्यावर असतो. अनेकदा कर्जाचे हप्ते फेडता-फेडता संपूर्ण कुटुंबच कोलमोडून जाते. वधू-वर पित्यांनी इच्छा दर्शविली तर आम्ही ‘चायपे शादी’ लावून देऊ, असे त्यांनी सांगितले. ‘सौतन’ चित्रपटातील ‘शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है, इसी लिए मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया हैं’ हे गाणे एकेकाळी खूप गाजले. तर, वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘चाय पे चर्चा’ गाजली. आता हाच सर्वांना प्रिय असणारा आणि चर्चेतला ‘चहा’ वधूपित्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचविणार आहे.
-----------------------------------------------------------------------

जकात, अबकारी शुल्क विभागाशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी; मोदींचा तीव्र संताप व्यक्त

जकात आणि अबकारी शुल्क विभागाशी संबंधित लोकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वित्त मंत्रालयाशी संलग्न असलेल्या या दोन्ही विभागांबाबतच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी उच्चस्तरीय निगराणी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी हे बुधवारी दिवसभर आर्थिक कामकाजावरील मंत्रिमंडळ समिती आणि मंत्रिमंडळ व विविध योजनांशी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात व्यस्त होते. सरकारचे कुठे आणि काय चुकते आहे, हे जाणून घेणे आणि सरकारची प्रतिमा उजळण्यासाठी काय करता येईल, यावर विचारमंथन करणे हा या मंत्रिस्तरीय संवादाचा उद्देश होता.
मोदी यांनी आपल्या कार्यालयात मोठ्या संख्येने प्राप्त होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत, ही समस्या निर्माण होण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. ‘मेरे कान पक गये है,’ असे पंतप्रधान मोदी वित्त मंत्रालयाच्या तीन सचिवांसह अन्य मंत्रालयांच्या वरिष्ठ सचिवांना उद्देशून म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कडक निगराणी यंत्रणेच्या माध्यमातून या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश मोदींनी या विभागांच्या सचिवांना दिले.

No comments: