Wednesday, 27 January 2016

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशमध्ये अखेर आज राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्राची शिफारस स्वीकारली आहे. 
एकीकडे प्रजासत्ताक दिनाचं सेलिब्रेशन सुरु असतानाच तिकडे चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. कालच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबंधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली होती. त्यानंतर यासंदर्भातला निर्णय आज घेण्यात आला. 

यासंदर्भातलं एक प्रकरण आधीच न्यायालयात सुरु आहे. शिवाय असा निर्णय सरकारनं घेतल्यानं आता काँग्रेस कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. 16 डिसेंबर 2015 मध्ये अरुणाचलमधले 21 काँग्रेस आमदार हे बंडखोरी करत भाजपच्या गोटात सामील झाले होते. 60 सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे आधी फक्त 11 आमदार होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानंतर अरुणाचलमध्ये सत्तापालटाचं षडयंत्र सुरु झालं होतं. विधानसभा अध्यक्षांना डावलत उपाध्यक्षांच्या मदतीनं अविश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेण्याचे प्रयत्न भाजपनं सुरु केले होते. मात्र, या ठरावाच्या विरोधात काँग्रेसनं कोर्टात धाव घेतली. 
यासंदर्भातला निर्णय सध्या सुप्रीम कोर्टात होणं बाकी आहे. पण त्याआधीच केंद्र सरकारनं अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी चालू केली होती. अरुणाचल हे चीनच्या सीमेवर असल्यानं अतिशय संवेदनशील मानलं जातं. तिथल्या राजकीय पडसादांचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवरही परिणाम होऊ शकतो. शिवाय देशाचं आणखी एक सीमेवरचं राज्य काश्मीरही सध्या अधांतरी आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनाला 20 दिवस होत आले तरी इथे अजून सरकार बनलेलं नाही. भाजपसोबतच पुन्हा जायचं की काँग्रेसला जवळ करायचं या द्विधा मनस्थितीत सध्या पीडीपी आहे.

No comments: