Friday, 4 December 2015

डेंगी व मलेरीया आजाराच्‍या नियंत्रणासाठी नागरीकांनी जागरुक राहावे - जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे




नांदेड 4, जिल्‍हयात डेंगी, मलेरीया व स्‍वाईनफ्ल्‍यू वाढणार नाहीत यासाठी आरोग्‍य विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबविण्‍याच्‍या सक्‍त सूचना जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी दिल्‍या आहेत.
तसेच डेंगी, हिवताप व चिकनगुनिया यासारख्‍या आजारांपासून दूर राहण्‍यासाठी नागरीकांनी जागरुक राहावे व आजारांची लक्षणे आढळून आल्‍यास वेळीच नजीकच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्‍णालयात उपचार घ्‍यावेत, असे आवाहन डॉ. शिंदे केले आहेत.  
      हिवताप आजारात रुग्‍णास थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरतो हा ताप एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्‍णांना पांघरुण घ्‍यावेसे वाटते नंतर घाम येऊन ताप कमी होतो व रुग्‍णास थकवा येतो. अशी लक्षणे आढणा-या रुग्‍णांनी त्‍वरीत रुग्‍णालयात जाऊन उपचार घ्‍यावेत.
     डेंगीच्‍या लक्षणात रुग्‍णास दोन ते सात दिवस तीव्र स्‍वरुपाचा ताप येतो. यामध्‍ये डोकेदुखी, सांधेदुखी, स्‍नायूदूखी होऊन उलटया होणे, डोळयाच्‍या आत दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक तोंड यातून रक्‍तस्‍त्राव होतो, अशक्‍तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे ही लक्षणे दिसून येतात. नांदेड जिल्‍हयात 30 नोव्‍हेंबर 2015 पर्यंत 5 लाख 25 हजार रुग्‍णांच्‍या रक्‍त तपासणीनंतर 64 जणांना हिवताप असल्‍याचे आढूळन आले आहे. संशयित 289 डेंगी रुग्‍णांचे रक्‍त नमुने तपासण्‍यात आले यात 47 रुग्‍णांना डेंगीची लागण झाल्‍याचे तपासणीत आढळून आले आहे.
      नागरीकांनी डेंगी व हिवताप यांच्‍या प्रतिबंधासाठी आपल्‍या घराभोवती पाणी साचू देऊ नये, घरातील सर्व पाण्‍याचे सर्व साठे आठवडयातून एक दिवस रिकामे करुन कोरडा दिवस पाळावा. तसेच पाण्‍याचे साठे गच्‍च झाकणाने झाकून ठेवावे, झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावे, शक्‍यतो मच्‍छरदानीचा वापर करावा. आपल्‍या गावात औषधी फवारणी पथक आल्‍यास संपूर्ण घर फवारुण घ्‍यावे, घराच्‍या छतावर व आजूबाजूला असलेले फुटके डब्‍बे, टाकाऊ टायर्स, मडकी आदींची विल्‍हेवाट लावावी. अशाप्रकारे नागरीकांनी दक्षता घेतल्‍यास डेंगी व मलेरीया आजारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. यासाठी सर्व नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.बालाजी शिंदे केले आहेत. 

No comments: