Saturday, 2 January 2016

सह्याद्री वाहिनिच्‍या साडेनऊच्‍या बातम्‍यात 4 जानेवारी रोजी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे




                              नांदेड, 2- नांदेड जिल्‍हयातला डासमुक्‍तीचा पॅटर्न आता राज्‍यात लागू झाला असून, या अभियानाच्‍या यशोगाथासाठी नांदेड जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांना सोमवार दिनांक 4 जानेवारी रोजी मुंबई दूरदर्शनच्‍या सह्याद्री वाहिनिच्‍या साडेनऊच्‍या बा‍तम्‍यात निमंत्रित करण्‍यात आले आहे.
      ग्रामीण भागात जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने राबविण्‍यात येणारे विविध केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या योजना प्रभावीपणे राबविलल्‍या जात असल्‍यामुळे जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगलाताई गुंडले यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्‍यमान उंचाविण्‍यासाठी शौचालयसह स्‍नानगृहाची मोहिम यशस्‍वी झाल्‍यानंतर गावातील सांडपाण्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी हिमायतनगर तालुक्‍यातील टेंभूर्णी गावातील बंदीस्‍त गटारमुक्‍तीचा अभ्‍यास करुन हे अभियान जिल्‍हयात राबविण्‍यास सुरवात झाली.
    वर्षभरात सुमारे शंभर गावात हा प्रयोग यशस्‍वी झाल्‍यानंतर दिल्‍ली, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे झालेल्‍या कार्यशाळेतुन श्री अभिमन्‍यू काळे यांनी डासमुक्‍त गाव अभियानाचे सादरीकरण केले. त्‍यामुळे या अभियानाची दखल घेण्‍यासाठी राज्‍यातील विविध खात्‍याचे मंत्री, प्रधान सचिव, वरिष्‍ठ अधिकारी, पत्रकार आदींनी नांदेड जिल्‍हयातील गावांची पाहणी केली.
      गावस्‍तरावरील सांडपाणी व्‍यवस्‍थापन, भूगर्भातील पाणी पातळीची वाढ, साचणारे डबके नाहीसे झाल्‍यामुळे डास निर्मिती बंद झाली. यामुळे आरोग्‍यावर होणारा खर्च, गटार  बांधण्‍याचा खर्च वाचला. गावस्‍तरावरील भेडसावणारा प्रश्‍न एका शोषखडयामुळे संपूष्‍टात येऊ शकतो याचा अभ्‍यास झाल्‍यामुळेच राज्‍य शासनाने संपूर्ण राज्‍यात डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न राबविण्‍याचा शासन निर्णय काढला. नांदेड जिल्‍हयाचा हा पॅटर्न राज्‍यातील सर्व जनेतेपर्यंत पोहचावा यासाठी मुंबई दूरदर्शनच्‍या सह्याद्री वाहिनीच्‍या साडेनऊच्‍या बातम्‍यात मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे. सोमवार दिनांक 4 जानेवारी रोजी श्री अभिमन्‍यू काळे राज्‍यातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.

No comments: