नांदेड,(प्रतिनिधी)-पुणे येथे आज पासून सुरु झालेल्या २८ व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये नांदेडच्या महिला पोलिस खेळाडू रेणुका देवणे यांनी पहिले सुवर्ण पदक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जिंकून आपली चुणूक दाखवली.
नांदेड जिल्ह्यातील महिला पोलिस रेणुका उत्तम देवणे यांना काही दिवसापूर्वीच नांदेडचे पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया यांनी नानवीज दौंड पुणे येथे कवायत प्रशिक्षणासाठी पाठवले.नांदेड येथून रेणुका देवणे आणि पोलिस कर्मचारी बाळू जमरे यांचे नाव महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धांसाठी पाठवण्यात आले होते.नानवीज दौंड येथे गेल्यावर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम.बी.चेनीगुंड यांनी रेणुका देवने आणि नांदेड जिल्ह्याचे दुसरे पोलिस कर्मचारी बाळू जमरे यांना २८ व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे येथे पाठवले.
२८ व्या महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धा ३ जानेवारी ते ९ जानेवारी या दरम्यान पुणे येथे सुरु आहेत.आज पहिल्या क्रीडा प्रकारात रेणूका देवणे यांनी गोळाफेक मध्ये १०.२४ फुट गोळा फेकला आणि प्रथम क्रमांक मिळवला.दुसऱ्या स्थानावर पुणे शहराच्या प्रियंका दाने यांनी ९.३८ फुट गोळाफेक करून आपली रजत पदक मिळवले.तिसऱ्या स्थानावर ८.८० फुट गोळा फेकून मुबई शहरच्या राजश्री पाटील यांनी कास्य पदक मिळवले.
रेणुका देवणे यांनी मिळवलेल्या यशासाठी राज्य राखीव पोलिस बल नानवीजचे प्राचार्य एम.बी.चेनीगुंड,नांदेडचे पोलिस अधीक्षक परमजीतसिंह दहिया,अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे,शाम घुगे,राखीव पोलिस निरीक्षक तरमान तडवी आणि अनेक सहकारी पोलिस कर्मचार्यांनी रेणुका देवणे यांचे अभिनंदन केले आहे.तसेच त्यांना भालाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी शुभकामना दिल्या आहेत.

No comments:
Post a Comment